नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवरच्या शेअरच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एनएसईवर कंपनीचा शेअर ४९४.८५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. टाटा पॉवरच्या शेअर्सच्या किमती वाढण्यामागचं कारण म्हणजे मॉर्गन स्टॅनलीचा नवा अंदाज. ब्रोकरेज हाऊसने कंपनीचे रेटिंग बदलले आहे.
मॉर्गन स्टॅनलीने आपले 'अंडरवेट' रेटिंग 'ओव्हरवेट' केले आहे. टाटा पॉवरचे शेअर्स ५०० रुपयांच्या पुढे जातील, असा ब्रोकरेज हाऊसचा विश्वास आहे. ब्रोकरेज हाऊसने ५७७ रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनीही या शेअरला 'बाय' टॅग दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने ५३० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले आहे.
एनएसईवर कंपनीचा शेअर जवळपास 4 टक्क्यांनी वधारून 494.85 रुपयांवर पोहोचला. मात्र, यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २३०.८० रुपये आहे.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी आहे?
गेल्या वर्षभरात टाटा पॉवरच्या शेअरच्या किमती तब्बल ८५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 23 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अवघ्या 1 महिन्यात कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
४ जुलै रोजी कंपनीच्या शेअर्सचा एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार झाला. त्यानंतर कंपनीने प्रति शेअर दोन रुपये लाभांश दिला. टाटा समूहाच्या या कंपनीत टाटा सन्सचा ४६ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)