Tata Group bigger than 'टाटा' समूहाबद्दल भारतीयांच्या मनात एक वेगळी आपुलकी आहे. टाटा हे विश्वासाचं दुसरं नाव आहे असं मानलं जातं. त्यामुळं टाटा समूहाशी संबंधित चर्चेत भारतीयांना विशेष स्वारस्य असतं. टाटा समूहाशी संंबंधित अशीच एक बातमी सध्या चर्चेत आहे. एकट्या टाटा समूहानं पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला मागे टाकलं आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, टाटा समूहाचं मार्केट कॅप ३६५ अब्ज डॉलर अर्थात, ३०.३० लाख कोटी रुपये आहे. तर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालानुसार, पाकिस्तानचं ढोबळ आर्थिक उत्पन्न (GDP) ३४१ अब्ज डॉलर आहे. याचाच अर्थ एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे.
टाटा समूहात सोन्यापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं मूल्यांकन १५ लाख कोटी रुपये म्हणजेच १७० अब्ज डॉलर्स आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. मूल्यांकनाचा विचार करता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही एकटी कंपनी पाकिस्तानच्या अर्धी अर्थव्यवस्थेच्या आकाराइतकी आहे.
गेल्या वर्षभरात टाटा मोटर्स आणि ट्रेंटच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळं टाटा समूहाचं मूल्यांकन वाढलं. गेल्या वर्षी टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ आला होता. या आयपीओनं गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. टाटा टेक्नॉलॉजीज व्यतिरिक्त, टीआरएफ, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटो मोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्स्टन इंजिनिअरिंग यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले.
सध्या टाटा समूहाच्या किमान २५ कंपन्या सूचीबद्ध आहेत. यापैकी गेल्या एका वर्षात केवळ टाटा केमिकलनं नकारात्मक परतावा दिला आहे. यावरून टाटा समूहाच्या कंपन्या शेअर बाजारात उत्तम कामगिरी करत असल्याचं स्पष्ट होतं.
टाटा समूहाच्या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध नाहीत. यामध्ये टाटा सन्स, टाटा कॅपिटल, टाटा प्ले, टाटा ॲडव्हान्स सिस्टम आणि एअर इंडिया, विस्तारा यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केल्यास टाटा समूहाचं मार्केट कॅप १६० अब्ज डॉलरनं वाढून १७० अब्ज डॉलर होऊ शकतं.
टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये कंपनीचे मूल्य २.७ लाख कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्याच वेळी, ११ लाख कोटी रुपयांचं बाजार मूल्य असलेल्या टाटा सन्स कंपनीचा IPO सप्टेंबर २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. टाटा प्लेनं आधीच सेबीकडे आयपीओसाठी अर्ज केला आहे. मात्र, वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत ११ पटीनं लहान आहे. सध्या देशाचा जीडीपी सुमारे ३.७ अब्ज डॉलर आहे. जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी अपेक्षा आहे. सध्या भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
दुसरीकडं, पाकिस्तान सध्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. पाकिस्तानचं एकूण कर्ज आणि दायित्वे मिळून १२५ अब्ज डॉलर्स आहेत. त्याच वेळी, पाककडं फक्त ८ अब्ज डॉलर्सचं परकीय चलन आहे. यावर्षी सरकारला आपल्या महसुलातील ५० टक्के रक्कम कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी खर्च करावी लागणार आहे.