TCS Dividend News : डिविडंडच्या आशेनं शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अधूनमधून सुखद धक्के मिळत असतात. टाटा समूहाची दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) देखील असाच सुखद धक्का दिला आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस डिविडंड देऊ केला आहे. एका शेअरवर २७ रुपये मिळणार आहेत.
आपल्या गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याची टीसीएसची ही ७२ वी वेळ आहे. टीसीएसकडून डिविडंड मिळवण्याची गुरुवारी शेवटची संधी होती. मुंबई शेअर बाजारात टीसीएसचे शेअर्स गुरुवारी ०.५० टक्क्यांच्या वाढीसह ३९०३.५० रुपयांवर बंद झाले. आज सकाळी कंपनीचे शेअर ०.६८ टक्क्यांच्या वाढीसह खुला झाला. ही वाढ अद्यापही कायम आहे.
टीसीएसनं ११ जानेवारी रोजी डिसेंबर अखेरच्या तिमाहीसाठी लाभांश जाहीर केला होता. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांना ९ रुपये अंतरिम आणि १८ रुपये विशेष लाभांश दिला जाणार आहे. त्यासाठी आज, म्हणजेच १९ जानेवारी २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. येत्या ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा होईल, असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
टाटा समूहाच्या या दिग्गज कंपनीनं २००७ मध्ये पहिल्यांदा लाभांश दिला होता. तर, २००९ आणि २०१८ मध्ये बोनस दिला होता. दोन्ही वेळा कंपनीनं १ शेअरवर १ शेअर बोनस दिला होता.
टीसीएसच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचे शेअर घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत १५ टक्के नफा कमावला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३,९६५ रुपये आणि ३,०७०.२५ रुपये आहे.
एचसीएल टेक या कंपनीनं देखील प्रत्येक इक्विटी शेअरमध्ये १२ रुपयांचा अंतरिम लाभांश घोषित केला आहे. त्यासाठी २० जानेवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. हा लाभांश ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गुंतवणूकदारांना मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील लेख केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या