रतन टाटांच्या निधनानंतर शेअर बाजारात काय घडलं? टाटा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर पडले की वाढले? वाचा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रतन टाटांच्या निधनानंतर शेअर बाजारात काय घडलं? टाटा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर पडले की वाढले? वाचा!

रतन टाटांच्या निधनानंतर शेअर बाजारात काय घडलं? टाटा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर पडले की वाढले? वाचा!

Published Oct 10, 2024 01:52 PM IST

Tata Group Share Price : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या समूहातील कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणूकदारांचं बारीक लक्ष आहे.

रतन टाटांच्या निधनानंतर शेअर बाजारात काय घडलं? टाटा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर पडले की वाढले? वाचा!
रतन टाटांच्या निधनानंतर शेअर बाजारात काय घडलं? टाटा ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर पडले की वाढले? वाचा!

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर टाटा ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअरवर आज सर्वांचं लक्ष होतं. नेमकं काय होणार याविषयी साशंकता होती. मात्र, गुंतवणूकदारांनी टाटाच्या शेअरवर विश्वास दाखवत खरेदी सुरू ठेवल्यामुळं आज ग्रुपमधील बहुतेक कंपन्यांचे शेअर चांगलेच वधारले आहेत.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS), टाटा पॉवर कंपनी लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड आणि टायटनसह टाटा समूहातील कंपन्यांचे समभाग आज चर्चेत आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पचा शेअर आज १० टक्क्यांपेक्षा जास्त वधारून ७४०३.४५ रुपयांवर पोहोचला होता. इतर कंपन्यांमध्येही अशीच तेजी आहे.

कोणते शेअर वधारले?

टाटा पॉवरचा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वधारला असून आज हा शेअर ४६९.३० रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,४९,५४१.८९ कोटी रुपये आहे.

टाटा इलेक्सीचा शेअर आज ४ टक्क्यांनी वधारून ८,००० रुपयांच्या वर गेला. दुपारी दोन वाजता हा शेअर २.२५ टक्क्यांनी वधारून ७७८५.३० रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४९,००६.८९ कोटी रुपये आहे.

टाटा स्टीलचा शेअर देखील किंचित वधारला आहे. दुपारी दोन वाजता हा शेअर १५९ रुपयांवर व्यवहार करत आहे. या कंपनीचं मार्केट कॅप १,९९,७३५.०८ कोटी रुपये आहे.

टाटा कम्युनिकेशनचा शेअर जवळपास १ टक्क्यांनी वधारला असून तो सध्या १९६६.३५ रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५६१४२.१५ कोटी रुपये आहे.

टाटा केमिकलचा शेअर आज ५.३९ टक्क्यांनी वधारला असून ११६४.९५ रुपयांवर गेला आहे. कंपनीचं मार्केट कॅप २९,६६७.६४ कोटी रुपये आहे.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा शेअरही किंचित वधारला आहे. हा शेअर सध्या १११८.५० रुपयांवर आहे.

काही शेअरमध्ये घसरण

ट्रेंटचा शेअर सध्या २ टक्क्यांच्या जवळपास घसरला आहे. या कंपनीचा शेअर ८०७१.९५ रुपयांवर व्यवहार करत आहे. टाटा मोटर्स, टायटन, टीसीएसचे शेअरही काही प्रमाणात घसरले आहेत.

टाटा समूहाचं भांडवली मूल्य किती?

२०२३-२४ मध्ये टाटा समूहातील कंपन्यांचा महसूल एकूण १६५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होता. या कंपन्यांनी मिळून १० लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत सूचीबद्ध एकूण २६ टाटा कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३६५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होते.

मार्केट एक्सपर्ट्स काय म्हणतात?

'रतन टाटा यांनी समूहाच्या वाढीस चालना देऊन भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि कोट्यवधी सामान्य गुंतवणूकदारांना या महापुरुषाच्या दूरदृष्टीचा लाभ झाला. टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर आणि इंडियन हॉटेल्स सारखे शेअर्स खरेदी करून त्यांनी उभारलेल्या औद्योगिक साम्राज्याला गुंतवणूकदार श्रद्धांजली अर्पण करू शकतात, असं मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट आणि मार्केट एक्स्पर्ट व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केलं आहे.

Whats_app_banner