Haldiram Sale News : उद्योग जगतात रोजच्या रोज काही ना काही करार आणि व्यवहार होतच असतात. या प्रत्येक व्यवहाराची चर्चा होतेच असं नाही. मात्र, एका संभाव्य व्यवहारानं उद्योग जगतासह गुंतवणूकदारांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. टाटा समूहातील टाटा कन्झुमर आणि भारतीय बाजारातील सर्वात मोठा स्नॅक्स ब्रँड हल्दीराम यांच्यातील डीलची ही बातमी आहे. अर्थात, हल्दीरामनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, टाटा कन्झुमर ही कंपनी हल्दीराम ब्रँडमध्ये ५१ टक्के शेअर खरेदी करण्याची शक्यता आहे. हा सौदा १ हजार कोटी अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे ८२ हजार कोटींमध्ये होईल, असंही रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे. हल्दीरामनं हे वृत्त फेटाळताना टाटाच्या कंपनीशी आमची कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं म्हटलं आहे.
या वृत्तानंतर टाटा कन्झुमरचा शेअर सकारात्मक वाटचाल करू लागला आहे. आज या कंपनीचा शेअर ०.६० टक्क्यांनी वाढून ८४८.९० रुपयांवर पोहोचला. टाटा कन्झुमरच्या शेअरची गेल्या आठ महिन्यातील कामगिरी गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं फारशी समाधानकारक नव्हती. जानेवारीपासून आतापर्यंत कंपनीनं केवळ ११ टक्के परतावा दिला आहे. तर, मागच्या सहा महिन्यांत कंपनीनं १७.८२ टक्के रिटर्न्स दिले आहेत.
टाटा कन्झुमर सोबतच्या डीलबरोबरच हल्दीरामचा आयपीओ येत असल्याचीही एक चर्चा सध्या बाजारात आहे. आयपीओ आणण्याच्या आधी हल्दीराम कुटुंब नागपूर आणि दिल्लीतील आपला व्यवसाय एकत्र करून एक संयुक्त कंपनी स्थापणार असल्याचंही बोललं जात आहे.
हल्दीराम हा परंपरागत चालत आलेला एका कुटुंबाचा व्यवसाय आहे. मात्र, जसजसा या व्यवसायाचा विस्तार झाला, तसा कुटुंबातील नव्या पिढीमध्ये ट्रेडमार्क आणि वर्चस्वावरून कुरघोड्या सुरू झाल्या. सध्या हल्दीराम यांचे तीन मुलगे मूलचंद, रामेश्वर लाल आणि सतीदास आणि त्यांचीही मुलं वेगवेगळ्या नावानं भारतीय बाजारात घट्ट पकड राखून आहेत. यात हल्दीराम सन्स, बिकाजी, हल्दीराम नागपूर, हल्दीराम भुजियावाला या उप ब्रँडचा समावेश आहे. आता नागपूर आणि दिल्लीतील व्यवसाय एकत्र करून देशातील सर्वात मोठी स्नॅक्स कंपनी बनण्याचा या कुटुंबाचा विचार आहे.
नागपूर येथील हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल सध्या सर्वात मोठे बंधू शिव किशन अग्रवाल यांच्याकडं आहे, तर दिल्लीतील हल्दीराम स्नॅक्स मनोहर आणि मधुसुदन अग्रवाल हे चालवतात.