Tata Group Stock : टाटा समूहातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा केमिकल्सचा (Tata Chemicals) शेअर गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं गटांगळ्या खाताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत हा शेअर तब्बल १८ टक्क्यांनी घसरला असून मार्केट एक्सपर्ट्सनी गुंतवणूकदारांना विक्रीचा सल्ला दिला आहे.
टाटा केमिकल्सच्या शेअरमध्ये आज दिवसभरात एनएसईवर (NSE) २.५० टक्क्यांची घसरण दिसून आली. या घसरणीमुळं शेअरची किंमत आज ११४६ रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर या शेअरमध्ये आणखी घसरण होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
टाटा केमिकल्सच्या शेअरनं गुरुवारी बीएसईवर ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. त्या दिवशी या शेअरनं १३४९.७० रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर अचानक धडकलेल्या एका बातमीमुळं यात सातत्यानं घसरण होत आहे. अवघ्या २ दिवसांत टाटा केमिकल्सचा हा शेअर १८ टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ९२२.२० रुपये प्रति शेअर आहे.
CNBC TV-१८ च्या एका वृत्तानुसार, ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीनं या शेअरच्या विक्रीचा सल्ला दिला आहे. पुढच्या काही दिवसांत कंपनीचे शेअर ७८० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात, असा या ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे. याचाच अर्थ, हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा ३३ टक्क्यांनी घसरू शकतो.
टाटा केमिकल ही जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अॅश उत्पादक कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०२७ दरम्यान टाटा केमिकलचा Ebitda (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई) अत्यंत उत्साहवर्धक राहील व कंपनी जोमानं वाटचाल करेल, असा अंदाज फिच रेटिंग्जनं वर्तवला होता. या अंदाजानंतर गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या आणि टाटा केमिकलचा शेअर खरेदी करण्यासाठी उड्या पडल्या.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, टाटा सन्सचा आयपीओ पुढील काही वर्षांत येणं अपेक्षित होते. मात्र, टाटा सन्स आयपीओ आणण्यास टाळाटाळ करत आहे. हे वृत्त पसरल्यामुळं त्याचा थेट फटका टाटा केमिकल्सच्या शेअरना बसला आहे. टाटा केमिकल्सची टाटा सन्समध्ये ३ टक्के भागीदारी आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची व्यक्तिगत आहेत. त्याच्याशी हिंदुस्तान टाइम्स मराठी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या