Share Market News Today : प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचे शेअर आज तब्बल ११ टक्क्यांनी घसरले. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या शेअरमध्ये झालेली एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. स्विगीची स्पर्धक कंपनी झोमॅटोचे निराशाजनक निकाल स्विगीच्या शेअरमधील घसरणीला कारणीभूत ठरले आहेत.
स्विगीचा शेअर आज सकाळच्या सत्रात ११ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून ४२७ रुपयांपवर पोहोचला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा शेअर ४२० रुपयांवर लिस्ट झाला होता. आजच्या घसरणीनंतर तो या किंमतीच्या जवळ जाऊन पोहोचला. सध्या हा शेअर ३९० रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ११ टक्क्यांनी वाढून ट्रेड करत आहे.
झोमॅटोच्या कमकुवत निकालानंतर विश्लेषकांनी टार्गेट प्राइसमध्ये कपात केली आहे. त्यामुळं हा शेअर १३.३ टक्क्यांनी घसरून ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर २०७.८० रुपयांवर पोहोचला. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आणि त्याचा फटका आज स्विगीला बसला.
झोमॅटोचा नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ५७.३ टक्क्यांनी घसरून ५९ कोटी रुपयांवर आला आहे. ब्लिंकिट तोट्यात राहिला असून, तिमाहीत त्याला १०३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला असून स्टोअर विस्तारासाठी गुंतवणुकीला वेग दिल्यानं नजीकच्या काळात ही कंपनी तोट्यातच राहील, असा कंपनीचा अंदाज आहे.
क्विक कॉमर्स (QC) सेगमेंटमधील स्पर्धा वाढत असून विविध कंपन्यांनी अनेक ठिकाणी आपला जम बसविण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचा परिणाम कॅशवर झाला आहे. स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून आपला क्यूसी व्यवसाय चालवते आणि याच विभागातील इतर कंपन्यांमध्ये स्टार्टअप झेप्टो, तसेच वॉलमार्ट समर्थित फ्लिपकार्ट आणि टाटा समूहसमर्थित बिगबास्केट सारख्या प्रतिस्पर्ध्यांचा समावेश आहे.
मूल्यांकनाच्या दृष्टीनं स्विगीचे शेअर्स झोमॅटोच्या शेअर्सपेक्षा स्वस्तात ट्रेड करत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये स्विगीची वॉल्यूम ग्रोथ सुधारली आहे. त्यामुळं वॉल्यूम वाढीच्या बाबतीत दोघांमधील अंतर अर्थपूर्णरित्या कमी झालं आहे.
संबंधित बातम्या