स्विगीच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. स्विगीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीला आयपीओसाठी भागधारकांची मान्यता मिळाल्यापासून अनलिस्टेड मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये रस वाढला आहे. याच कारणामुळे अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. स्विगीने आयपीओसाठी गोपनीय फाइलिंग मार्गाने सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती.
या वर्षी जुलैमध्ये अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीचा शेअर ३५५ रुपयांच्या जवळपास व्यवहार करत होता. गेल्या 2 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीचे शेअर्स ४९० रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहेत. सॉफ्टबँक आणि प्रोससच्या पाठिंब्याने स्विगीचे बाजारमूल्यही दोन महिन्यांत ७०,००० कोटी रुपयांवरून १.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीच्या शेअर्सचा लॉट साइज १०० शेअर्सच्या आसपास आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या उत्कृष्ट वाढीमुळे त्याच्या समभागांना इतकी जोरदार मागणी आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ३६ टक्क्यांनी वाढून ११२४७ कोटी रुपये झाला आहे. तर कंपनीचा निव्वळ तोटा ४४ टक्क्यांनी कमी होऊन २३५० कोटी रुपयांवर आला आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, अनेक सेलिब्रिटींनी स्विगीवर सट्टा लावला आहे. राहुल द्रविड, अमिताभ बच्चन आणि करण जोहर सह अनेक सेलिब्रिटींनी या कंपनीतील हिस्सा खरेदी केला आहे.
बेंगळुरूची फूड अँड किराणा डिलिव्हरी कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ११,००० कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे. यामध्ये ३७५० कोटी रुपयांची नवीन इक्विटी विक्री आणि ६६६४ कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (ओएफएस) चा समावेश आहे.