Stock Market News Today : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज ५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. ब्रोकरेज हाऊस सीएएलएसनं स्विगीच्या शेअरच्या टार्गेट प्राइसबद्दल व्यक्त केलेल्या नव्या अंदाजामुळं शेअरमध्ये ही वाढ दिसून आली आहे. सीएलएसएनं स्विगीला बाय टॅग दिला आहे. कंपनीचा शेअर ७०० रुपयांच्या पुढं जाईल, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
स्विगी लिमिटेडचा शेअर आज बीएसईवर वधारून उघडला. मंगळवारी कंपनीचा शेअर ५६७.८० टक्क्यांनी वधारून ५६७.८० रुपयांवर पोहोचला. ही किंमत स्विगी लिमिटेडच्या ५७६.९५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आहे. गेल्या २ आठवड्यात स्विगीच्या शेअर्सच्या किंमतीत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सुरुवातीला उसळलेला हा शेअर हळूहळू घसरला व दिवसअखेर ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह ५४२ रुपयांवर बंद झाला.
सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊसनं ७०८ रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केले आहे. ब्रोकरेज हाऊसनं स्विगीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याची टार्गेट प्राइस सोमवारच्या बंदपेक्षा ३१ टक्क्यांनी जास्त आहे. स्विगीच्या शेअर्सवर नजर ठेवून असलेल्या ८ ब्रोकरेज हाऊसेसपैकी ३ ब्रोकरेज हाऊसेसनी शेअर खरेदीचा, ३ ब्रोकरेजनं विक्रीचा आणि २ ब्रोकरेज हाऊसेसनी होल्डिंगचा सल्ला दिला आहे.
स्विगीसाठी चांगली बाब म्हणजे कंपनीनं सप्टेंबर तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या तिमाही निकालानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण तोटा ६२५.५० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६५७ रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचं एकूण उत्पन्न ३६०१.४५ कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २७६३.३३ कोटी रुपये होता.