Swiggy Share Price : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर आज बीएसईवर ७.३ टक्क्यांनी वधारून ४८९.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सध्या तो घसरून ट्रेड करत आहे. मात्र तरीही हा शेअर लिस्टिंगच्या पातळीपेक्षा वर आहे.
स्विगीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर इश्यू प्राइसपेक्षा १७ टक्क्यांनी वधारून लिस्ट झाला होता. अवघ्या दोन दिवसात स्विगीच्या शेअरची किंमत २५ टक्क्यांहून अधिक वाढली. कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे.
कालच्या बंदच्या तुलनेत आज म्हणजेच गुरुवारी बीएसईमध्ये स्विगीचा शेअर ४७२ रुपयांच्या पातळीवर उघडला. यानंतर कंपनीचे शेअर्स ४८९.२५ रुपयांच्या पातळीवर पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, नंतर कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास स्विगीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होते.
कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राइस ३९० रुपये प्रति शेअर होती. बीएसईवर स्विगीचे समभाग ५.६४ टक्क्यांच्या प्रीमियमवर ४१२ रुपयांवर सूचीबद्ध झाले. तर, एनएसईवर हा शेअर ७.७ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४२० रुपयांवर लिस्ट झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजने स्विगीच्या शेअर्सना 'अॅड' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने ४३० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केले आहे. दलाल हाउस जेएम फायनान्शियल देखील स्विगीच्या शेअरबाबत आशावादी आहे. त्यांनी मार्च २०२६ साठी ४७० रुपये उद्दिष्ट ठेवले आहे. आज कंपनीच्या शेअर्सनी या दोन्ही टार्गेट किमती ओलांडल्या होत्या.