Stock Market : स्विगीचे शेअर्स विकून पळू लागले गुंतवणूकदार; आयपीओ किमतीच्याही खाली गेला भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : स्विगीचे शेअर्स विकून पळू लागले गुंतवणूकदार; आयपीओ किमतीच्याही खाली गेला भाव

Stock Market : स्विगीचे शेअर्स विकून पळू लागले गुंतवणूकदार; आयपीओ किमतीच्याही खाली गेला भाव

Published Feb 06, 2025 10:51 AM IST

Swiggy Share Price : चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाही निकालानंतर फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Stock Market : स्विगीचे शेअर विकून पळू लागले गुंतवणूकदार; आयपीओ किमतीच्याही खाली गेला भाव
Stock Market : स्विगीचे शेअर विकून पळू लागले गुंतवणूकदार; आयपीओ किमतीच्याही खाली गेला भाव

Swiggy Share Crash : क्विक कॉमर्स क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी स्विगीला तिमाही निकालानंतर मोठा झटका बसला आहे. तिमाही तोटा मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं धास्तावलेले गुंतवणूकदार कंपनीचा शेअर विकून पळू लागले आहेत. त्यामुळं शेअरच्या भावानं नवा नीचांक गाठला आहे. आजच्या व्यवहारात हा शेअर आयपीओ किंमतीपेक्षाही खाली गेला.

शेअर बाजार उघडताच स्विगीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरला आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३८७ रुपयांवर घसरला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा सुमारे ८०० कोटी रुपयांवर गेला आहे.

ऑनलाइन ऑर्डरवर अन्न आणि किराणा मालाचा पुरवठा करणाऱ्या स्विगीचा निव्वळ तोटा ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत वाढून ७९९.०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५७४.३८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. कंपनीच्या तोट्यात वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्विगीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ३,७०० कोटी रुपयांवरून कंपनीचा एकूण खर्च ४८९८.२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचं ऑपरेटिंग उत्पन्नही या तिमाहीत ३,०४८.६९ कोटी रुपयांवरून ३,९९३.०६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

काय म्हणाली कंपनी?

स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीहर्ष माजेटी यांनी तिमाही निकालांवर भाष्य केलं आहे. 'सणासुदीच्या काळात ग्राहकांना विशेष ऑफर देण्यावर आमचा भर आहे, ज्यामुळे ग्राहक अधिकाधिक सेवा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

किती होती आयपीओ प्राइस?

मागील वर्षी आलेला स्विगीचा आयपीओ आला होता. हा शेअर १३ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. स्विगीचे शेअर्स आयपीओच्या किमतीच्या ८ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाले होते. कंपनीच्या शेअरची आयपीओ किंमत ३९० रुपये होती. आजच्या व्यवहारात हा शेअर ३९० च्याही खाली गेला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner