Swiggy News in Marathi : फूड डिलिव्हरी व क्विक कॉमर्स उद्योगातील प्रमुख कंपनी स्विगीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०२५) च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. झोमॅटो व झेप्टोला टक्कर देऊ पाहणाऱ्या स्विगीला या निकालांनी दणका दिला आहे. कंपनीचा निव्वळ तोटा वाढून ८०० कोटींवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत स्विगीचा तिमाही तोटा ५२४ कोटी रुपये होता. प्रतिस्पर्धी झोमॅटो आणि झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीनं क्विक कॉमर्स व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्याचाही परिणाम नफ्यावर झाला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नव्यानं सूचीबद्ध झालेल्या स्विगीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ३,९९३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ३,०४९ कोटी रुपये होतं. कंपनीचा एकूण खर्च गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ३,७०० कोटी रुपयांवरून ४,८९८.२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कामकाजाच्या आघाडीवर डिसेंबर तिमाहीत व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशन (EBITDA) तोट्याआधी स्विगीचं उत्पन्न ५२५ कोटी रुपयांच्या तुलनेत ७२५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. स्विगीची एकूण ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढून १२,१६५ कोटी रुपये झाली आहे.
एबिटडा हे निव्वळ उत्पन्न मोजण्याचं एक पर्यायी मापक आहे आणि याचा वापर कंपनीच्या नफ्याचं आणि आर्थिक कामगिरीचं मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. स्विगीचा फूड डिलिव्हरी बिझनेस (GOV) वार्षिक १९.२ टक्क्यांनी वाढून ७,४३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जीओव्ही हे वितरण आणि पॅकेजिंग शुल्कासह ऑर्डरचं एकूण आर्थिक मूल्य आहे.
समायोजित एबिटडा तिमाही-दर-तिमाही (QoQ) ६३.७ टक्क्यांनी वाढून १८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत स्विगीचा क्विक कॉमर्स महसूल दुपटीनं वाढून ११४ टक्क्यांवर पोहोचला असून फूड डिलिव्हरी महसूल २३.५ टक्क्यांनी वाढला आहे. ईबीआयटी वाढून १९३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २६ कोटी रुपये होता.
स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष माजेटी म्हणाले, 'सणासुदीच्या तिमाहीत आम्ही ग्राहकांसाठी सेगमेंटेडनिहाय ऑफर देण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. स्विगीचा क्विक कॉमर्स व्यवसाय असलेल्या स्विगी इन्स्टामार्टनं ग्राहकांचा वाढता खर्च आणि नवीन शहरांमध्ये विस्तार यामुळे जीओव्हीमध्ये वार्षिक ८८ टक्क्यांनी (१५.५ टक्के क्यूओक्यू) वाढ नोंदवून ३,९०७ कोटी रुपये केली आहे.
क्विक-कॉमर्समधील वाढीच्या गुंतवणुकीमुळं आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील योगदान मार्जिन -१.९ टक्क्यांवरून तिसऱ्या तिमाहीत -४.६ टक्क्यांवर आलं आहे. स्विगीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 'क्विक डिलिव्हरी बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक होत असताना इन्स्टामार्टच्या वाढीचा वेग कायम आहे. डिसेंबर तिमाहीत स्विगीच्या तिन्ही प्राथमिक व्यवसायांमध्ये विक्रमी वार्षिक वाढ झाली. त्यामुळं बी 2 सी जीओव्ही वाढ ३८ टक्क्यांपर्यंत झाली.
‘अलीकडच्या महिन्यांत, आम्ही बोल्ट अँड स्नॅक (१० मिनिटांत फूड डिलिव्हरी) सादर केलं आहे. क्विक कॉमर्सच्या नवीन श्रेणींमध्ये विस्तार केला आहे. आम्ही रेस्टॉरंट इव्हेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्विगी सीन्स देखील लॉन्च केले आहेत आणि आमच्या स्विगी वन सब्सक्रिप्शन प्रोग्रामचा प्रीमियम टियर वन बीएलसीके सादर केला आहे,’ असं कंपनीचे सीईओ माजेटी म्हणाले.
स्विगीच्या ऑपरेटिंग सेगमेंटमध्ये फूड डिलिव्हरी सर्व्हिस, आउट ऑफ होम कंझम्पशन, क्विक कॉमर्स, सप्लाय चेन अँड डिस्ट्रीब्युशन आणि प्लॅटफॉर्म इनोव्हेशनचा समावेश आहे. प्लॅटफॉर्म इनोव्हेशनमध्ये खासगी ब्रँड्स, स्विगी जिनी, स्विगी-मिनीस, वेडली गुड इत्यादी सारख्या व्यवसाय वर्टिकल्ससह नवीन सेवा ऑफरसाठी इन्क्युबेटरचा संच असतो. इन्स्टामार्ट आता ८४ शहरांमध्ये उपलब्ध आहे. मार्चपर्यंत स्विगी चाळीस लाख चौरस फुटांचे सक्रिय डार्क स्टोअर क्षेत्र गाठण्याच्या मार्गावर आहे.
संबंधित बातम्या