Swiggy New Service : शेअर बाजारात अलीकडंच सूचीबद्ध झालेली ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं बुधवारी 'वन बीएलसीके' सेवा सुरू केली. हा एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप प्लॅन असून त्याद्वारे ग्राहकांना वेगवान सेवा दिली जाणार आहे. या सेवेसाठी ग्राहकांना २९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.
'वन बीएलसीके' सदस्यांना जलद फूड डिलिव्हरी दिली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. ज्यात वन टाइम गॅरंटीही असेल. याशिवाय सदस्यांना टॉप कस्टमर केअर एजंटचाही अॅक्सेस मिळणार आहे. तसंच त्यांच्या अडचणी प्राधान्यानं सोडवल्या जाणार आहेत. स्विगीच्या 'वन बीएलसीके' सेवेसाठी ग्राहकांना २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. यात त्यांना ३ महिन्यांची सुविधा मिळणार आहे.
कंपनी टप्प्याटप्प्यानं 'वन बीएलसीके' सेवा सुरू करणार आहे. सध्या ही सुविधा देशातील निवडक ग्राहकांनाच मिळणार आहे. त्याचबरोबर स्विगीचे विद्यमान 'वन मेंबर्स' देखील त्यात अपग्रेड होऊ शकतात.
ही इंडस्ट्रीची पहिली प्रीमियम मेंबरशिप आहे. 'वन बीएलसीके' हा मेंबरशिप प्लॅन असून यात फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्स अशा विविध श्रेणींत ऑफर्स मिळणार आहेत. अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार आदी भागीदार ब्रँडशी संबंधित ऑफर्सही सदस्यांना मिळणार आहेत.
स्विगीचे सहसंस्थापक आणि सीजीओ फणी किशन म्हणाले, 'स्विगी 'वन बीएलसीके' आमच्या ग्राहकांसाठी बिझनेस क्लासप्रमाणे काम करेल. या लाँचिंगद्वारे आम्ही फूड डिलिव्हरी उद्योगात एक नवा बेंचमार्क सेट करत आहोत. २०२१ मध्ये कंपनीनं स्विगी वन मेंबर्स ही योजना लाँच केली होती. यातील ८० टक्के सदस्य एक किंवा अधिक स्विगी सेवा वापरतात. तसंच, हे मेंबर्स स्विगीच्या सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ३ पट जास्त खर्च करतात.
संबंधित बातम्या