Swiggy IPO : ऑनलाइन ऑर्डर घेऊन फूड सर्व्हिस देणाऱ्या स्विगी या आघाडीच्या कंपनीचा बहुचर्चित आयपीओ दिवाळीनंतर गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ बुधवार, ६ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. गुंतवणूकदारांना शुक्रवार, ८ नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी स्विगीचा आयपीओ मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. त्यासाठी दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ही किंमत ३७१ ते ३९० अशी आहे. आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. स्विगीआयपीओ लॉट साइज ६५ इक्विटी शेअर्सचा आहे.
११,३०० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ४,५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि ६,८०० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल (OFS) चा समावेश आहे. स्विगीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) ७५ टक्क्यांपर्यंत शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तर १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २५ रुपयांची सवलत दिली जात आहे.
स्विगीची स्थापना २०१४ साली झाली. ही कंपनी फूड डिलिव्हरी, किराणा आणि इतर घरगुती वस्तूंची ऑनलाइन डिलिव्हरी करते. ही कंपनी क्विक कॉर्मस व्यवसायातही आहे. शेअर बाजारात आधीपासूनच सूचीबद्ध असलेली झोमॅटो ही या कंपनीची प्रतिस्पर्धी आहे. मार्च २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत स्विगी लिमिटेडच्या महसुलात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीची तूट याच कालावधीतील ४,१७९.३१ कोटी रुपयांवरून २,३५०.२४ कोटी रुपयांवर आली आहे.
बुधवारी स्विगीचा आयपीओ जीएमपी २५ रुपयांच्या प्रीमियमवर आहे. InvestorGain.com दिलेल्या माहितीनुसार, ग्रे मार्केटमध्ये स्विगीचे शेअर्स २५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच स्विगीच्या शेअर्सची अंदाजित लिस्टिंग किंमत ४१५ रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच ही आयपीओ किंमत ३९० रुपयांपेक्षा ६.४१ टक्क्यांनी जास्त आहे.
संबंधित बातम्या