ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित आयपीओ आहे. स्विगीच्या आयपीओबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बाजार नियामक सेबीकडूनही आयपीओला हिरवा कंदील मिळाला आहे. आता हा आयपीओ नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
दिग्गज सेलिब्रिटींमध्येही या कंपनीच्या शेअरची जबरदस्त क्रेझ आहे. क्रिकेटपासून ते सिनेसृष्टीपर्यंत स्विगीचा शेअर विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे. राहुल द्रविडपासून अमिताभ बच्चन आणि चित्रपट निर्माते करण जोहरपर्यंत स्विगीच्या प्री-आयपीओमध्ये गुंतवणूक केल्याच्या बातम्या येत आहेत. जाणून घेऊया सविस्तर…
इकॉनॉमिक टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्विगीच्या आयपीओपूर्व शेअर्सचा असूचीबद्ध बाजारात सक्रिय व्यवहार झाला. यामध्ये जवळपास 2 00,000 शेअर्स सेलिब्रिटींनी खरेदी केले होते. रिपोर्टनुसार, स्विगीच्या प्री-आयपीओ शेअर्समध्ये क्रीडा आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गजांनी अधिक रस घेतला आहे. या गुंतवणूकदारांमध्ये क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान, टेनिसस्टार रोहन बोपण्णा, करण जोहर आणि अभिनेता-उद्योजक आशिष चौधरी यांचा समावेश आहे.
स्विगीच्या आयपीओपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान, बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने, टेनिस स्टार रोहन बोपण्णा, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, अभिनेता आणि उद्योजक आशिष चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय इनोव्ह ८ चे संस्थापक रितेश मलिक यांनीही स्विगीमध्ये प्री-आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. आयपीओची योजना आखण्यापूर्वीच स्विगीने सॉफ्टबँक व्हिजन फंड, एक्सेल आणि प्रोसस सारख्या जागतिक व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून स्वतंत्र फंडिंग फेऱ्यांद्वारे निधी गोळा केला होता. दुय्यम बाजाराच्या माध्यमातूनही कंपनीने निधी उभा केला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनीही स्विगीमध्ये हिस्सा घेतला आहे.
ओपिनियन डिस्टर्बवे व्हेंचर्सचे सहसंस्थापक आशिष चौधरी म्हणाले, 'स्विगीने भारतातील फूड डिलिव्हरीचे चित्र बदलले आहे. फूड डिलिव्हरीपासून किराणा सेवेपर्यंत कंपनीच्या सततच्या इनोव्हेशनने स्पर्धात्मक नफा टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. झहीर खान म्हणाला की, "समाजावर सकारात्मक परिणाम करणारे मजबूत व्यवसाय मॉडेल असलेल्या नाविन्यपूर्ण कंपन्यांना पाठिंबा देण्यावर माझा विश्वास आहे. ही गुंतवणूक अशा ब्रँडला आधार देत आहे जी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एकामध्ये शहरी जीवनमान आणि ग्राहकांच्या सोयीचे भविष्य घडवत आहे.