स्विगी आणि झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी एजंट घरोघरी जाऊन हॉटेल्स, रेस्टॉरेंटचे खाद्यपदार्थांची ऑर्डर पोहचत असतात. प्रत्येक ऑर्डरमागे या एजंट्सना एक ठराविक कमिशन मिळत असते. परंतु बेंगळुरूमधील स्विगी कंपनीसाठी काम करणारा एक डिलिव्हरी एजंट तब्बल महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंतची कमाई करत असल्याचे एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीतून पुढे आले आहे. या स्विगी एजंटच्या महिन्याच्या कमाईबद्दल काही मनोरंजक माहिती पुढे आली आहे. ‘फुल डिस्क्लोजर’ असं या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. या चॅनलची अँकर लवीना कामत हिने बेंगळुरु शहरात रस्त्यावर दोन डिलिव्हरी एजंटांना गाठलं. या डिलिव्हरी एजंटना त्यांच्या महिन्याच्या कमाईबद्दल प्रश्न विचारले असता ते दोघांची महिन्याची सरासरी कमाई ही आयटी इंजिनिअरपेक्षा जास्त असल्याचं आढळलं.
लवीना कामत सांगते, ‘भारतात आयटी इंजिनिअरचा महिन्याचा पगार सरासरी २०,००० रुपये असतो. मात्र बेंगळुरुत मी ज्या दोन फूड डिलिव्हरी एजंटशी बोलले त्यांना यापेक्षा दुप्पट पगार मिळतो.’
स्विगीमध्ये डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करणारा २२ वर्षीय शिवा हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत आहे. शिवाची दर महिन्याला तब्बल ४० ते ५० हजार रुपये कमाई होते. शिवाला स्विगीच्या प्रत्येक डिलिव्हरीवर २० रुपये कमिशन मिळते. मात्र टिप्समधून शिवाला दर महिन्याला सुमारे ५ हजार रुपये मिळत असल्याचं त्याने सांगितलं.
स्विगी डिलिवरी बॉय शिवा आर्थिक बचतीवर भर असते. गेल्या सहा महिन्यांत शिवाने दोन लाख रुपयांची बचत केली आहे. गावात जाऊन डी-मार्ट उघडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो बचतीचे पैसे वापरणार आहे. डी-मार्टमुळे गावातील तरुणांना रोजगार मिळेल असं शिवाचं म्हणण आहे.
दरम्यान, तायप्पा हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून बेंगळुरुमध्ये झोमॅटो कंपनीसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतोय. युट्यूबर लवीना कामत हिने तायप्पाशी संवाद साधून त्याच्या महिन्याच्या कमाईबाबत विचारले. तायप्पा महिन्याला ४० हजार रुपयांपर्यंत कमाई करतो, असं त्यानं स्पष्ट केलं.
लवीना कामत यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. फूड डिलिव्हरी एजंट अगदी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सपेक्षा जास्त कमाई करत असल्याचं कामत यांनी लिहिलं आहे. मात्र, बहुतांश डिलिव्हरी बॉय हे या कामाकडे करिअर म्हणून पाहत नाहीत. तर भविष्यातील चांगल्या संधीसाठी ते याकडे पैसे कमविण्याचे साधन म्हणून पाहतात. डिलिव्हरी बॉय हे दिवसाला १२ ते १३ तास काम करून एवढी कमाई करतात, याकडेही लवीन कामत यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, या फूड डिलिव्हरी बॉयच्या कमाईमुळे अनेक लोक चांगलेच प्रभावित झाले असल्याचं व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंटमधून दिसून येत. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या तुलनेत डिलिव्हरी एजंट किती मेहनत घेतात याकडे काहींनी लक्ष वेधलं आहे. डिलिवरी बॉय म्हणून काम करण्याचा त्रास अभियंत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो, असे एका इन्स्टाग्राम युजरने लिहिलं आहे. 'लोकांना हे कळत नाही की इंजिनीअर २५-३० हजारांपासून सुरूवात करतो. परंतु शेवटी त्याच्या एकूण पॅकेजमध्ये मोठी वाढ होत असते. परंतु डिलिव्हरी बॉयच्या बाबत हे होत नाही. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही' अशी प्रतिक्रिया एका यूजरने लिहिली आहे.
एक युजर लिहितो,'महिन्याला ७० हजार रुपये कमावणाऱ्या एका झोमॅटो रायडरला मी ओळखतो. मात्र तो न थांबता, दिवसरात्र काम करायचा. त्याने एवढ्या डिलिव्हरी करून इतके पैसे कमावल्याबद्दल झोमॅटोने त्या डिलिवरी बॉयला लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून दिले होते.'
संबंधित बातम्या