‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’ला रेस्टॉरंट संघटनेचा विरोध, थेट आयोगाकडं तक्रार; झोमॅटो, स्विगीचे शेअर गडगडले!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’ला रेस्टॉरंट संघटनेचा विरोध, थेट आयोगाकडं तक्रार; झोमॅटो, स्विगीचे शेअर गडगडले!

‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’ला रेस्टॉरंट संघटनेचा विरोध, थेट आयोगाकडं तक्रार; झोमॅटो, स्विगीचे शेअर गडगडले!

Published Jan 10, 2025 03:30 PM IST

NRAI against Swiggy Zomato : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या स्विगी आणि झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज घसरण झाली. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट कारण ठरली आहे.

दहा मिनिटाच्या डिलिव्हरी विरोधात तक्रार होताच झोमॅटो, स्विगीचे शेअर गडगडले!
दहा मिनिटाच्या डिलिव्हरी विरोधात तक्रार होताच झोमॅटो, स्विगीचे शेअर गडगडले!

Share Market News : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनी सुरू केलेल्या '१० मिनिटांत डिलिव्हरी' संकल्पनेला नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियानं (NRAI) विरोध केल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. 

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोचे शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ट्रेडिंगदरम्यान मोठ्या प्रमाणावर घसरले. स्विगीचा शेअर ४९० रुपयांच्या खाली घसरला, तर झोमॅटोच्या शेअरची किंमत २४० रुपयांच्या खाली आली. दिवसअखेर झोमॅटोचा शेअर १ टक्क्यापर्यंत घसरून २४३.२५ रुपयांवर बंद झाला. तर, स्विगीचा शेअर ३ टक्क्यांनी घसरून ४९१.१० वर बंद झाला.

एनआरएआयनं झोमॅटो आणि स्विगीच्या नुकत्याच झालेल्या खासगी लेबलिंग आणि क्विक कॉमर्स फूड डिलिव्हरीच्या निर्णयाला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर, भारतीय स्पर्धा आयोगाकडं (CCI) धाव घेतली आहे. 

दहा मिनिटांत डिलिव्हरीला विरोध का?

एनआरएआयच्या म्हणण्यानुसार, ब्लिंकिट बिस्ट्रो आणि स्विगी स्नॅक सारख्या स्वतःच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खासगी लेबलवर अन्न वितरित करत आहे. झोमॅटो आणि स्विगी स्वत:हून खासगी लेबलिंग आणि खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत, हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असं एनआरएआयचे अध्यक्ष सागर दरयानी यांनी म्हटलं आहे.

एनआरएआयच्या म्हणण्यानुसार, झोमॅटो आणि स्विगी त्यांच्या नेटवर्क डेटाचा फायदा घेऊन थेट किंवा त्यांच्या उपकंपन्यांद्वारे खाजगी-लेबल फूड डिलिव्हरी करत आहेत. या धोरणामुळं या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेला रेस्टॉरंट व्यवसाय तर नष्ट होतोच, शिवाय कॉपीराईट कायदा आणि संबंधित कायद्यांतर्गत ही चिंतेची बाब आहे. 

स्नॅक आणि बिस्ट्रो झालेत लाँच

स्विगीनं स्नॅक हा अ‍ॅप डिझाइन केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून १५ मिनिटांत नाश्ता, पेय आणि जेवण वितरित केलं जाणार आहे. तर, झोमॅटोनं नुकतंच ब्लिंकिटच्या माध्यमातून बिस्ट्रो लाँच केलं आहे. हे अ‍ॅप १० मिनिटांत स्नॅक्स, फूड आणि ड्रिंक्स डिलिव्हरी करण्याचा दावा करते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner