Suzlon Share price : अवघ्या वर्षभरापूर्वी १० रुपयांच्याही आता असलेला व गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहणारा सुझलॉन एनर्जीचा शेअर सध्या तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. गेल्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्यानं वाढणारा हा शेअर आज थेट ८० पार गेला आहे. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. सुझलॉनच्या या घोडदौडीमुळं गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आहे.
शेअरमधील सततच्या तेजीमुळं सुझलॉन एनर्जीनं शुक्रवारी प्रथमच १ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला. आज किंमतीच्या बाबतीत शेअरनं पुढचा टप्पा गाठला. कंपनीचा शेअर बीएसईवर ७६.५८ च्या मागील बंदच्या तुलनेत ३.५ टक्क्यांनी वाढून ७९.३० रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. आज ८९.६२ लाख शेअर्सच्या खरेदीमुळं तब्बल ६९.३९ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
गेल्या एका वर्षातील ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर ३१२ टक्के वाढला आहे. हा शेअर सध्या १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. सुझलॉनचा शेअर एका वर्षात २९२ टक्के वाढला आहे आणि तीन वर्षांत १२१८ टक्के वाढला आहे.
सुझलॉनच्या शेअरबद्दल विविध बाजारतज्ज्ञांनी 'बिझनेस टूडे'ला दिलेली माहिती पुढीलप्रमाणे…
'प्रभुदास लीलाधर'चे टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट शिजू कूथुपलक्कल यांच्या म्हणण्यानुसार, या शेअरनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. हा शेअर ८२ ते ९८ रुपयांचं लक्ष्य ठेवून आणि ७१ रुपयांचा स्टॉप लॉस लावून खरेदी करण्यास हरकत नाही. खरेदी करून हा शेअर होल्ड करून ठेवल्यास नफा पदरात पडू शकतो.
SAMCO सिक्युरिटीजचे टेक्निकल अॅनालिस्ट ओम मेहरा म्हणाले, 'सुझलॉन एनर्जीनं मोठ्या कालावधीनंतर ७० रुपयांचा गतिरोधक ओलांडला आहे आणि तो सतत वधारत आहे. ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी शेअरला बळ देत आहे. जोपर्यंत स्टॉक ६५ रुपयांच्या वर राहील तोपर्यंत ट्रेंड सकारात्मक राहील.
सँक्टम वेल्थचे डेरिव्हेटिव्ह आणि टेक्निकल हेड आदित्य अग्रवाल म्हणाले, 'दीर्घकाळाचा विचार करत सुझलॉनसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील काही महिन्यांत हा स्टॉक ९४ ते १०२ च्या पातळीवर जाऊ शकतो. मात्र, अल्प मुदतीच्या दृष्टीकोनातून स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये आहे आणि ८० ते ८२ रुपयांवर अडखळताना दिसतोय. या पातळीवर आम्हाला काही नफा बुकिंगची अपेक्षा आहे. ज्यांच्याकडं आधीपासून हा शेअर आहे, ते ६४ चा स्टॉपलॉस लावून होल्ड करू शकता तर नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांनी ६८ ते ७० च्या पातळीवर प्रवेश करावा.