सुझलॉन एनर्जीचा शेअर तुमच्याकडं असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे! कंपनीला मिळालाय मोठा दिलासा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सुझलॉन एनर्जीचा शेअर तुमच्याकडं असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे! कंपनीला मिळालाय मोठा दिलासा

सुझलॉन एनर्जीचा शेअर तुमच्याकडं असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे! कंपनीला मिळालाय मोठा दिलासा

Dec 30, 2024 06:14 PM IST

Suzlon Energy Share Price : इन्कम टॅक्स लवादानं एका प्रकरणात बाजूनं निकाल दिल्यामुळं सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

इन्कम टॅक्सशी संबंधित खटला जिंकताच सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा चर्चेत; १७३ कोटींचा परतावा मिळणार
इन्कम टॅक्सशी संबंधित खटला जिंकताच सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा चर्चेत; १७३ कोटींचा परतावा मिळणार

Stock Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर जोरदार चर्चेत राहिला. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ६३.८५ रुपयांवर पोहोचला. इन्कम टॅक्सशी संबंधित एका खटल्यात कंपनीच्या बाजूनं लागलेला निकाल यासाठी कारणीभूत ठरला आहे.

सुझलॉननं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे.  त्यानुसार इन्कम टॅक्सच्या नॅशनल फेसलेस पेनल्टी सेंटरनं २०१७ या आर्थिक वर्षासाठी कंपनीला १७२.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मार्च २०२४ मध्ये सुझलॉननं एक्सचेंजला याची माहिती दिली. त्याचवेळी, या आदेशाविरोधात कंपनीनं प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाकडं अर्ज दाखल केला होता आणि आता लवादानं कंपनीच्या बाजूनं निकाल दिला आहे. त्यानुसार, कंपनीला तब्बल १७३ कोटींचा परतावा मिळणार आहे.

पाच वर्षांत २ रुपयांवरून ६३ रुपयांवर

सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये सातत्यानं चढ-उतार होत आहेत. कंपनीचे शेअर्स एका महिन्यात ६ टक्क्यांनी घसरले असून सहा महिन्यांत १७ टक्क्यांनी वाढले आहेत. २०२४ मध्ये हा शेअर आतापर्यंत ६३ टक्क्यांनी वधारला आहे. पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या दरम्यान त्याची किंमत २ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. 

विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला!

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ८६.०४ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ३५.४९ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८४,९१३.६८ कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये एफआयआयकडे १०.८८ टक्के हिस्सा होता. सप्टेंबर २०२४ मध्ये तो वाढून २३.७२ टक्के झाला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner