Suzlon Energy Share price : एक दशकाहून अधिक काळ गुंतवणूकदारांना रडवणाऱ्या सुझलॉन एनर्जी शेअर्सनं मागच्या वर्षभरापासून वेग पकडला आहे. त्यानंतर उत्तरोत्तर हा शेअर वधारत आहे. आजचा दिवसही त्यास अपवाद नाही. आज सेन्सेक्स व निफ्टीमध्ये घसरण होत असतानाही सुझलॉनच्या शेअरनं ५ टक्क्यांहून अधिक उसळी घेत नवा उच्चांक गाठला.
बीएसईवर सुझलॉन कंपनीचा शेअर ८१.९९ रुपयांवर उघडला. यानंतर कंपनीचा शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वधारून ८४.४० रुपयांवर पोहोचला. मात्र, काही काळानंतर त्यात घसरण झाली. दुपारी १२ वाजता हा शेअर ८२.२५ रुपयांवर ट्रेड करत होता.
सुझलॉन एनर्जीच्या सध्याच्या चांगल्या कामगिरीमागे अनेक कारणं आहेत. चांगल्या तिमाही निकालांबरोबरच कंपनीकडं अनेक मोठ्या वर्कऑर्डर आहेत. कंपनीशी संबंधित आणखी एका बातमीनं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. कंपनी रेनम एनर्जी सर्व्हिसेसचं अधिग्रहण करणार आहे. कंपनी ७६ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सना 'ओव्हरवेट' म्हटलं होतं. या ब्रोकरेज हाऊसनं ७३.४ रुपये टार्गेट प्राइस निश्चित केल होतं. मात्र, ही पातळी ओलांडून सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनं मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज चुकीचा ठरवला आहे. मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरनं सुझलॉनच्या शेअरवर ८२ ते ९८ रुपयांचं टार्गेट प्राइस ठेवलं आहे.
अवघ्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ४७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कंपनीचं मार्केट कॅप १,११,७४७.८४ कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. या वर्षी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये १०८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर निफ्टी-५० मध्ये केवळ १२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास ३०० टक्क्यांनी वाढली आहे.