Suzlon Energy Q3 Results : गेल्या काही दिवसांपासून घसरत चाललेल्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये आज जोरदार वाढ झाली आणि शेअरला अप्पर सर्किट लागलं. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. या तेजीनंतर मार्केट एक्सपर्ट्सनी शेअरच्या टार्गेटमध्ये वाढ केली आहे.
बीएसईवर सुझलॉनचा शेअर आज ५ टक्क्यांनी वाढला आणि ५२.७६ रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या नफ्यात ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ८६.०४ रुपये असून ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३५.४९ रुपये आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जीला ३८७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक आधारावर ऊर्जा कंपनीच्या नफ्यात ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुझलॉन एनर्जीला २०३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ तिमाहीत ऊर्जा कंपनीचा महसूल ९१ टक्क्यांहून अधिक वाढून २९६९ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचं उत्पन्न १,५५३ कोटी रुपये होतं.
जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सना ओव्हरवेट रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्ससाठी ७१ रुपयांचं प्राइस टार्गेट ठेवलं आहे. सुझलॉन एनर्जीची मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नवीन ब्लेड मॅन्युफॅक्चरिंग लाइनसाठी ३५० ते ४०० कोटी रुपयांची कॅपेक्स योजना आहे. ब्रोकरेज हाऊस नुवामानंही सुझलॉन एनर्जीचं रेटिंग होल्ड टू बायवरून अपग्रेड केलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं सुझलॉन एनर्जीच्या शेअर्ससाठी ६० रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे.
सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत १९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. १ जानेवारी २०२५ रोजी ऊर्जा कंपनीचा शेअर ६५.३४ रुपयांवर होता. २९ जानेवारी रोजी तो ५२.७६ रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या