Share Market News : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मागील दोन दिवस कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. आज तिसऱ्या दिवशीही तेच चित्र कायम होतं. आज हा शेअर ५ टक्क्यांनी वाढून ५८.१७ रुपयांवर पोहोचला आहे. सलग तीन दिवस लागलेल्या अप्पर सर्किटमुळं मागच्या ५ दिवसांत हा शेअर १३.८१ टक्क्यांनी वाढला आहे.
जवळपास १२ ते १५ वर्षे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळवणारा सुझलॉन एनर्जीचा शेअर मागील दीड वर्षांपासून पुन्हा सावरू लागला. मे २०२३ मध्ये ८ रुपयांवर असलेला हा शेअर आज ५८ रुपयांवर आहे. मागच्या ५ वर्षात शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल २४८५ टक्के परतावा दिला आहे.
लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी सांगितलं की, ‘कंपनीनं ४४७ मेगावॅटची विक्रमी डिलिव्हरी नोंदविली आहे. ही वाढ १६३ टक्क्यांची आहे. कंपनीचं ऑर्डर बुक ५.५ गिगावॅटच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. एस १४४ टर्बाइन एकूण ९२ टक्के आहेत. रतलाम आणि जैसलमेर इथं नवीन उत्पादन लाइन्स जोडून सुझलॉन आपली उत्पादन क्षमता देखील वाढवत आहे. या धोरणात्मक विस्तारांमुळं सुझलॉनच्या वाढीला प्रचंड वाव आहे.'
तांत्रिक चार्ट पॅटर्नवर सकारात्मक स्थितीत असलेल्या सुझलॉन एनर्जीच्या शेअरला ५५ रुपयांवर प्रतिकार होत होता, असं एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी सांगितलं. हा अडथळा ओलांडल्यास सुझलॉनचे शेअर्स अत्यंत तेजीत येऊ शकतात, असं सचदेवा यांनी म्हटलं होतं. आता ५५ चा टप्पा पार केल्यामुळं पुढं आशा आहे.
संबंधित बातम्या