Suzlon Share Price : अनेक वर्षे गुंतवणूकदारांना रडवणाऱ्या सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये मागच्या तीन वर्षांपासून १२०० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हा शेअर सातत्यानं घसरत आहे. एनएसईवर ८४ रुपयांचा उच्चांक गाठलेला हा शेअर आता ७३ पर्यंत खाली घसरल्यानं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
सलग तिसऱ्या सत्रात सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आज (२ सप्टेंबर २०२४) आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसईवर कंपनीचा शेअर २.६९ टक्क्यांनी घसरून ७३.७९ रुपयांवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग दरम्यान सुझलॉन एनर्जीचं मार्केट कॅपही एक लाख कोटी रुपयांच्या खाली गेलं होतं. मात्र, व्यवसायाच्या अखेरीस ते १ लाख कोटी रुपयांच्या वर गेलं आहे. सुझलॉनच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८४.४० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांक २१.७१ रुपये आहे.
पवन ऊर्जा व्यवसायाशी संबंधित सुझलॉन एनर्जी या कंपनीच्या शेअरनं तब्बल दशकभर गुंतवणूकदारांना अक्षरश: रडकुंडीला आणलं होतं. गेल्या ३ वर्षांपासून हा शेअर पुन्हा सावरू लागला आहे. या कालावधीत त्यात १२१३ टक्के वाढ झाली आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी सुझलॉन एनर्जीचा शेअर ५.६५ रुपयांवर होता. तो आज ७३.७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ३ वर्षात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जवळपास २३०० टक्के वाढ झाली आहे. ६ सप्टेंबर २०१९ रोजी एनएसईवर कंपनीचा शेअर २.९४ रुपयांवर व्यवहार करत होता. तो आज ७३.७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षांत त्यात २४१० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये २०६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या वर्षी आतापर्यंत सुझलॉन एनर्जीचे समभाग जवळपास ९२ टक्क्यांनी वधारले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३८.४८ रुपयांवर होता. तो आता ७३ रुपयांच्या पुढं गेला आहे. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागील अवघ्या ४ महिन्यांत हा शेअर जवळपास ७८ टक्क्यांनी वाढला आहे.