Stock Markets : छोट्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला शेअर पुन्हा उताराला लागला! किती आहे भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Markets : छोट्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला शेअर पुन्हा उताराला लागला! किती आहे भाव?

Stock Markets : छोट्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेला शेअर पुन्हा उताराला लागला! किती आहे भाव?

Jan 13, 2025 03:21 PM IST

Suzlon Energy Share Price : जवळपास १० ते १२ वर्षे गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा घेतल्यानंतर मागच्या दोन वर्षांपासून पुन्हा वाढलेला सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा एकदा उताराला लागला आहे.

सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा उताराला लागला! भाव पडताच खरेदीसाठी उडाली झुंबड
सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा उताराला लागला! भाव पडताच खरेदीसाठी उडाली झुंबड

Energy Share Price News : गेल्या काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर सातत्यानं घसरतो आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम राहिला. सुझलॉनचा शेअर आज २ टक्क्यांहून जास्त घसरला. त्यामुळं जवळपास ४ महिन्यांपूर्वी ८० रुपयांच्या वर असलेला हा शेअर आज ५४ रुपयांवर आला आहे.

सुझलॉन एनर्जी ही कंपनी नुतनीकृत ऊर्जा क्षेत्राला लागणारी विशेषत: पवन ऊर्जेसाठी लागणारी उत्पादनं पुरवते. हे व्हर्टिकल इंटिग्रेटेड विंड टर्बाइन जनरेटर (डब्ल्यूटीजी) उत्पादक आहे. ही कंपनी ७४,८९६ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे.

पवन ऊर्जा क्षेत्रातील नुतनीकृत ऊर्जेवर भारत सरकारनं लक्ष केंद्रीत केलं आहे. या संधीचा फायदा कंपनी घेत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. गेल्या महिन्यात क्रिसिल रेटिंग्सनं सुझलॉन एनर्जीवरील क्रेडिट रेटिंग सकारात्मक दृष्टीकोनासह 'क्रिसिल ए' मध्ये अपग्रेड केलं होतं. कंपनीची मजबूत कामगिरी आणि सुधारित नफ्याची संकेत त्यातून मिळतो.

कशी आहे सुझलॉनची शेअरची अलीकडची वाटचाल?

सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये घसरण झाली असून या आठवड्यात हा शेअर ८ आणि या महिन्यात आतापर्यंत १८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत शेअरमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तीन महिन्यांत या शेअरमध्ये २७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र, दीर्घ मुदतीत सुझलॉनच्या शेअर्सनी शानदार परतावा दिला आहे. या शेअरमध्ये वर्षभरात २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दोन वर्षांत ४५७ टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाच वर्षांत हा शेअर दोन रुपयांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला. या काळात त्यात २३०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

डिसेंबर तिमाहीच्या निकालाचा आढावा

सुझलॉन एनर्जीला आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत महसुलात ७७ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती १,५६०.५ कोटी रुपये होती. कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील २०३ कोटी रुपयांच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी वाढून ३१५.४ कोटी रुपये झाला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत ऑपरेशनल स्तरावर एबिटडा ६७ टक्क्यांनी वाढून ४१३.१० कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner