देशात कृषी क्षेत्रात तब्बल ६४.४ टक्के महिला कार्यरत असून कृषी आधारित उद्योगात महिलांचा वाटा केवळ ६-१० टक्केच असल्याचे एका ताज्या अहवालात म्हटले आहे. गोदरेज अॅग्रोवेट, डीईआय लॅब आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी-आधारित उद्योगातील महिला – संधी आणि आव्हाने’ या विषयावर तयार करण्यात आलेला हा सर्वे आज मुंबईत आयोजित महिला कृषी परिषदेदरम्यान प्रकाशित करण्यात आला. या अहवालात महिलांचा कृषी व्यवसायातील सहभाग, नाविन्यपूर्णता आणि समान विकासासाठी कृती योग्य उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत.
या अहवालाबाबत बोलताना गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, ‘उत्तम दर्जाचे कृषी विषयाचे शिक्षण, कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविले तरच कृषी व्यवसायाचे भवितव्य आहे. कौशल्य आणि उद्योगाच्या गरजांशी जोडून घेत प्रोत्साहनपर अशा मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून आम्ही अर्थपूर्ण बदल घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादच्या प्राध्यापिका विद्या वेमिरेड्डी यांनी सांगितले, ‘भारतातील कृषी क्षेत्रात एक मोठा विरोधाभास दिसून येतो. कृषी विषयक कामात महिलांचा मोठा सहभाग दिसून येते. मात्र औपचारिक रोजगाराच्या रचनेत आणि नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये महिला फारच कमी दिसतात. कृषी क्षेत्रातील लिंगभेद दूर करण्यासाठी या अहवालात एक रोडमॅप देण्यात आला आहे. शिक्षण ते रोजगार बदलाला प्राधान्य देणे, महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे तसेच आर्थिक तसेच तांत्रिक साधनांचा उपयोग करणे या गोष्टी परिवर्तनात्मक धोरणे म्हणून अहवालात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना राबविल्यास महिला सक्षम होऊन कृषी मूल्य साखळीत त्यांच्या समान विकासाला चालना मिळेल, असं वासेरेड्डी म्हणाल्या.
गोदरेज अॅग्रोवेटच्या ह्युमन रिसोर्सेस विभागाच्या प्रमुख मल्लिका मुत्रेजा म्हणाल्या, ‘कृषी शिक्षणात ३० ते ४० टक्के महिला विद्यार्थिनींची नोंदणी होते. मात्र केवळ ६ टक्के ते १० टक्के महिला या देशातील अग्रगण्य कृषी आणि कृषी-संबंधित कंपन्यांमध्ये सध्या कार्यरत आहेत. या मोठ्या तफावतीवरून हे स्पष्ट होते की उद्योगाने ही दरी भरून काढण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. समावेशक धोरणांना प्रोत्साहन देऊन आणि संधी निर्माण करून, या असमतोलावर मात करता येईल तसेच महिलांच्या नाविन्यपूर्ण आणि खंबीर योगदानामुळे कृषी क्षेत्राच्या शाश्वत वाढीला चालना मिळेल.’
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन निसाबा गोदरेज आणि गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव यांनी ‘गोदरेज अॅग्रोवेट वूमेन इन अॅग्रीकल्चर स्कॉलरशीप’ची यावेळी घोषणा केली. ही शिष्यवृत्ती कृषी अभ्यास करणाऱ्या पाच विद्यार्थिनींना सक्षम बनवून पुढील पिढीत महिला नेतृत्व विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे.
.
संबंधित बातम्या