Penny stocks : बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) सनशाइन कॅपिटल लिमिटेडचा शेअर आज जोरदार चर्चेत होता. हा शेअर आज ४.४ टक्क्यांनी वधारून २.३४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या या वाढीसाठी एक मोठी घोषणा कारणीभूत ठरली आहे.
सनशाइन कॅपिटलनं जम्मू-काश्मीरमधील कठुआ इथं अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प विकसित करण्यासाठी मॅन स्टेनलेस स्टील ट्यूब्स लिमिटेडला (MSSTL) १९६४ दशलक्ष रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे.
गेल्या वर्षभरात सनशाइन कॅपिटलचा शेअर ३८० टक्क्यांनी वधारला आहे. तर, पाच वर्षांत हा शेअर ७ पैशांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. या काळात त्यात सुमारे ३३०० टक्के वाढ झाली आहे. ही कंपनी कर्जमुक्त आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प (यात नॉन-एपीआय इलेक्ट्रिक रेझिस्टन्स वेल्डेड कार्बन स्टील पाईपच्या उत्पादनाचा समावेश आहे) उत्पादन क्षेत्रात चालना देणारा ठरणार आहे. त्याची नियोजित क्षमता २,५०,००० मेट्रिक टन प्रतिवर्ष आहे. या उत्पादन प्रकल्पाचं एकूण मूल्य २८०७ दशलक्ष रुपये सांगितलं जात आहे. एमएसएसटीएलच्या नवीन उत्पादन युनिटला वित्तपुरवठा करून सनशाईन कॅपिटलनं स्टील ट्यूब उद्योगातील एका प्रमुख कंपनी आपली ग्राहक यादीत समाविष्ट केली आहे. या माध्यमातून उत्पादन क्षेत्राचा आघाडीचा अर्थ पुरवठादार म्हणून कंपनीनं आपली स्थिती मजबूत केली आहे.
सनशाईन कॅपिटलनं या वर्षी २०२४ मध्ये ७:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली होती. त्यासाठी ७ मार्च ही एक्स-डेट होती. सन १९९४ मध्ये स्थापन झालेली सनशाईन कॅपिटल लिमिटेड ही आघाडीची एनबीएफसी बनली आहे. ११ जुलै १९९४ रोजी कंपनी कायदा, १९५६ अन्वये स्थापन झालेली ही कंपनी डिपॉझिट न घेणारी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) याची नोंदणी आणि नियमन करते.