Sundar pichai should resign : गेल्या अनेक वर्षांपासून जगातील एक दिग्गज कंपनी गुगलचं नेतृत्व करणारे सुंदर पिचाई सध्या अडचणीत आले आहेत. वर्षाला तब्बल १८०० कोटींचं पॅकेज घेणाऱ्या भारतीय वंशाच्या या आयटी तज्ज्ञाच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.
गुगलचं नवीन एआय टूल 'जेमिनी'च्या अपयशामुळं ही चर्चा सुरू झाली आहे. 'हेलिओस कॅपिटल'चे संस्थापक समीर अरोरा यांनी त्या संदर्भात ट्विट केल्यामुळं चर्चेला बळकटी मिळाली आहे. अपयशी पिचाई यांना कंपनी नारळ देईल किंवा ते स्वत:हून राजीनामा देतील, असं अरोर यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडिया साइट 'एक्स'वर एका युजरनं गुगलच्या जेमिनी एआयच्या संदर्भात एक पोस्ट टाकली होती. 'गुगलचं जेमिनी पाहिलं का? ते गोऱ्या लोकांचं अस्तित्वच मानत नाही. सुंदर पिचाई भाग्यवान आहे की ते गोरे नाहीत, असं या युजरनं म्हटलं होतं. त्यावर समीर अरोरा यांनी कमेंट केली आहे. 'मला वाटतं पिचाई यांना काढून टाकलं जाईल किंवा ते स्वत: राजीनामा देतील.
जगातील आघाडीच्या टेक कंपन्या वेगानं एआयमध्ये प्रगती करत असताना गुगल संधी असतानाही त्यात अपयशी ठरले आहेत. इतरांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. हे सुंदर पिचाई यांचं अपयश असल्याचं बोललं जात आहे.
'जेमिनी' हा गुगलचा नवा एआय चॅटबॉट आहे. याआधी ते 'बार्ड' म्हणून ओळखलं जात होतं. गुगलनं आता ते जेमिनी म्हणून रीलाँच केलं आहे. गुगलच्या मते आता २३० हून अधिक देश आणि ४० पेक्षा अधिक भाषांतील लोक Gemini Pro 1.0 मॉडेलशी कनेक्ट करू शकतात.
जेमिनी एआय लॉन्च झाल्यानंतर आठवडाभरातच वादात सापडले. जेमिनी AI शी संबंधित इमेज-जनरेटर सदोष असल्याबद्दल २३ फेब्रुवारी रोजी गुगलनं माफी मागितली. वादात सापडल्यानंतर गुगलनं चॅटबॉटचं इमेज जनरेटर तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
गुगलच्या सर्च इंजिन आणि इतर व्यवसाय विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर राघवन यांनी जेमिनीनं दाखवलेल्या चुकीच्या आणि आक्षेपार्ह प्रतिमांबद्दल माफी मागितली. शिवाय, युजर्सनी चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. मात्र, राघवन यांच्या माफीनंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. जेमिनी एआय इमेज जनरेटरनं एका कृष्णवर्णीय महिलेला युनायटेड स्टेट्सचे संस्थापक पिता म्हणून दाखवल्याची उदाहरणं सोशल मीडियात व्हायरल झाली. तसंच, कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्तींना नाझी काळातील जर्मन सैनिक म्हणून दाखवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला जेमिनी एआयनं पक्षपाती उत्तर दिल्याबद्दल भारत सरकारचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खातं गुगलला नोटीस पाठवण्याचा विचार करत आहे, असं वृत्त आहे.
संबंधित बातम्या