Sukanya Samriddhi scheme new rules: मुलींसाठी लोकप्रिय असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. खाते उघडताना राहणाऱ्या त्रुटी दूर करण्याच्या उद्देशानं हे बदल करण्यात आले आहेत. १ ऑक्टोबर २०२४ पासून हे नियम लागू होणार आहेत.
नव्या नियमांनुसार, कायदेशीर पालक किंवा जन्मदात्या आई-वडिलांनी न उघडलेली खाती आता कायदेशीर पालकांच्या नावे ट्रान्सफर होणार आहेत. पूर्वी आजी-आजोबा आर्थिक सुरक्षितता म्हणून नातवंडांसाठी सुकन्या खातं उघडू शकत होते. मात्र, नव्या बदलानुसार केवळ कायदेशीर पालक किंवा जन्मदाते पालकच ही खाती उघडू शकतात आणि हाताळू शकतात. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी यापुढं केली जाणार आहे. नव्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त खाती असतील तर अतिरिक्त खातं बंद केलं जाणार आहे.
सुकन्या समृद्धी ही सरकार पुरस्कृत बचत योजना आहे. भारत सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बचतीवरील व्याजदर ८.२० टक्के आहे. १० वर्षांखालील मुलीच्या नावे हे खातं उघडता येतं.
पालकाची ओळख आणि पत्त्याचा पुरावा यासह मुलीचा जन्म दाखला बंधनकारक आहे. याशिवाय पालकाचं पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्याचबरोबर वारसदार बंधनकारक करण्यात आला आहे. नॉमिनी (वारस) एक किंवा अधिक व्यक्तींना केलं जाऊ शकतं परंतु चार पेक्षा जास्त व्यक्ती नॉमिनी असू शकत नाहीत.
कमीत कमी २५० रुपयांत सुकन्या खातं उघडता येतं. या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १,५०,००० रुपये योगदान देता येतं. खाते उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत योगदान खात्यात जमा केलं जातं. तसंच, खातं उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच हे खातं मॅच्युअर होतं.
अल्पवयीन व्यक्तीच्या नावे पीपीएफ (PPF) खाते उघडले असल्यास अशी व्यक्ती १८ वर्षांची होईपर्यंत या खात्यावरील रकमेवर पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. खातेधारक १८ वर्षांचा झाल्यावर पीपीएफच्या नियमानुसार व्याज मिळेल. तसंच, या खात्याचा परिपक्वता कालावधी खातेधारक १८ वर्षांचा झाल्यापासून मोजला जाईल.
एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असल्यास मूळ खात्यावर नियमाप्रमाणे व्याज मिळेल. दुसऱ्या खात्यातील रक्कम पहिल्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यानंतर एकूण रकमेवर पीपीएफच्या दरानं व्याज मिळेल. दोन पेक्षा अधिक खाती असल्यास त्यातील रकमेवर शून्य टक्के व्याज मिळेल.