PPF : पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांचं नवं वर्ष 'हॅप्पी' होणार
Small Savings Schemes Interest Rates : अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मध्यमवर्गीयांना केंद्र सरकारकडून खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Small Savings Interest Rates : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या छोट्या गुंतवणूकदारांना केंद्र सरकारकडून खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. सात अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यात सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफचाही समावेश आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं नवं वर्षी खऱ्या अर्थानं 'हॅप्पी' होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शेअर बाजार किंवा अन्य जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास न धजावणाऱ्या किंवा तितका पैसा हाती नसलेले छोटे गुंतवणूकदार केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. सुरक्षितता हा त्यातील महत्त्वाचा घटक असतो. यात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत कार्ड योजना, बचत ठेव योजना, १ आणि ५ वर्षांची मुदत ठेव, ५ वर्षांची आवर्ती ठेव योजनेचा समावेश आहे.
केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांचा आढावा घेत असते. त्यानंतर व्याजदर वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा किंवा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. केंद्रीय अर्थ मंत्रालय याबाबतचा निर्णय घेतं. याआधी डिसेंबरच्या तिमाहीसाठी सरकारनं काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले होते. ही वाढ ०.३० बेसिस पॉईंट इतकी होती.
असे आहेत सध्याचे व्याजदर
नोकरदार व मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या ७.१ टक्के व्याज मिळते. मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्के आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमवर ६.८ टक्के, सेव्हिंग डिपॉझिट स्कीमवर ४ टक्के, १ आणि ५ वर्षांपर्यंतची मुदत ठेवींवर अनुक्रमे ५.५ आणि ६.७ टक्के व्याज मिळते. तर, ५ वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेचा व्याजदर ५.८ टक्के आहे.