Multibagger Stock : शेअरचं विभाजन (Split) करण्याचा निर्णय काय चमत्कार करू शकतो याचा सुखद अनुभव सध्या सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचे शेअरहोल्डर्स घेत आहेत. या कंपनीचा शेअर १० तुकड्यांत विभागला गेल्यामुळं गुंतवणूकदारांचे १ लाखाचे ७ लाख झाले आहेत.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या शेअर्सची विभागणी करण्यात आली होती. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात कंपनीच्या शेअरनं एक्स-स्प्लिट व्यवहार केला होता. या स्प्लिटमुळं कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपयांवरून १ रुपयांपर्यंत खाली आली.
सुदर्शन फार्माचा आयपीओ मार्च २०२३ मध्ये आला होता. आयपीओच्या एका लॉटमधून १६०० शेअर्स जारी करण्यात आले. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १ लाख १६ हजार ८०० रुपये मोजावे लागले. समभाग विभाजनानंतर पोझिशनल गुंतवणूकदारांकडं असलेल्या एकूण शेअर्सची संख्या थेट १६,००० रुपयांवर गेली.
शुक्रवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ४८.८० रुपये प्रति शेअर होता. हा भाव आणि शेअर्सच्या संख्येची आकडेमोड केल्यास २ वर्षांत कंपनीनं १.१६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे ७.८० लाख रुपये केले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना जवळपास ७ पट नफा झाला आहे.
कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५३.५० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५.८२ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ११७४.४२ कोटी रुपये आहे.
सुदर्शन फार्मा सध्या फार्मा उद्योग आणि केमिकल उद्योगांसाठी स्वतंत्रपणे काम करते. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, सीरिया, ओमान, तैवान या देशांना कंपनी आपली उत्पादनं निर्यात करते. कंपनीनं वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जेनेरिक फॉर्म्युलेशन आणि औषधांचे उत्पादन, आऊटसोर्सिंग आणि पुरवठा करण्याचे कंत्राट कंपनी देते.