वारी एनर्जीजचा आयपीओ सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे समभाग १,५०३ रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडपेक्षा सुमारे ७० टक्क्यांनी वाढून २,५५० रुपयांवर सूचीबद्ध झाले. आज लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी हा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आहे.
बीएसईवर हा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २,४५४ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या आयपीओने केवळ सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाच दमदार परतावा दिला नाहीतर हितेश चिमणलाल दोशी यांना अब्जाधीश करून टाकलं आहे. कोण आहेत हे हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर…
हितेश चिमणलाल दोशी हे वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजीजचे चेअरमन आहेत. १९८५ मध्ये मुंबईत शिक्षण घेत असताना एका नातेवाईकाकडून ५ हजार रुपये उधार घेऊन दोशी यांनी या व्यवसायात पाऊल ठेवले. पाच हजार रुपये उधार घेऊन प्रेशर आणि टेम्परेचर गेज विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र, शिक्षण आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणे दोशी यांच्यासाठी अवघड होते. असे असूनही ते महिन्याला एक हजार रुपये नफा मिळवून कॉलेजची फी आणि राहणीमानाचा खर्च भागवत होते.
सप्टेंबर १९८९ मध्ये त्यांनी वारी इन्स्ट्रुमेंट्स या नावाने आपल्या व्यवसायाची नोंदणी केली आणि पहिल्या वर्षी त्यांच्या कंपनीची उलाढाल १२,००० रुपये झाली. आता जवळपास ४० वर्षांनंतर दोशी यांची कंपनी ७१,२४४ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
२०१४ मध्ये हितेश यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. त्यानुसार, त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात झाला. त्याचे वडील किराणा दुकान चालवायचे. गावात वीज आणि फोन सारख्या सुविधाही मर्यादित होत्या. केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण त्या गावात झाले, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना सायकलने दुसऱ्या गावी जावे लागले. बारावीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले आणि त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या श्री चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली. याच काळात त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि मग कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी त्यांनी १९८५ साली एका नातेवाईकाकडून ५ हजार रुपये उधार घेऊन तापमान मापकाचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांना वॉटर पंप, हीटर, कुकर, कंदील यांसारख्या विद्युत उपकरणांच्या व्यवसायात संधी दिसली.
काही वर्षांनी त्यांनी आपली छोटी कंपनी स्थापन केली आणि आपल्या गावातील वारी मंदिराच्या नावावरून या कंपनीचे नाव वारी एनर्जी ठेवले. त्यासाठी बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्जही घेतले होते. हळूहळू त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि २००७ मध्ये सौर ऊर्जा उपकरणांचे उत्पादन सुरू केले. अशा प्रकारे वारी एनर्जी नावारुपास आली. त्यांची सर्वात मोठी ऑर्डर अमेरिका आणि युरोपमधील ग्राहकांकडून आली.
एका सरकारी अहवालानुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतातील एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेपैकी नुतनीकृत ऊर्जा सुमारे निम्मी आहे आणि ४५७ गिगावॅट ऊर्जेत सौर ऊर्जेचा वाटा २० टक्के आहे.
सोमवारी वारी एनर्जीच्या लिस्टिंगमुळे दोशी आणि त्यांचे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंतांच्या पंक्तीत सामील झाले. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, वारी एनर्जीच्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतर दोशी कुटुंबाची नेटवर्थ सुमारे ५ अब्ज डॉलर (५०० कोटी रुपये) झाली आहे. ५७ वर्षीय हितेश दोशी हे वारी एनर्जीजचे चेअरमन आणि एमडी आहेत, तर त्यांचे दोन भाऊ आणि पुतणे ग्रुपचे संचालक आहेत. हे कुटुंब अभियांत्रिकी शाखा वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनर्जी स्टोरेज कंपनी वारी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक आहे. या दोन्ही कंपन्या आधीच सूचीबद्ध आहेत.
वारी एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी सौर मॉड्युल उत्पादक कंपनी असून त्याची क्षमता १२,००० मेगावॅट आहे. त्याचे बहुतेक उत्पन्न अमेरिकेतील निर्यात विक्रीतून येते. चिनी सौर शुल्कामुळे गेल्या काही वर्षांत लक्षणीय ते वाढलं आहे. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकदारांचा रस वाढत आहे. आयपीओच्या उत्पन्नातून कंपनी २८ अब्ज रुपये भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा राज्यात ६ गिगावॅट उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी खर्च करणार आहे.