Business Ideas : बिझनेसमध्ये संधी साधण्याची लाज बाळगू नका...
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas : बिझनेसमध्ये संधी साधण्याची लाज बाळगू नका...

Business Ideas : बिझनेसमध्ये संधी साधण्याची लाज बाळगू नका...

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 18, 2024 01:16 PM IST

How to find opportunities in Business - संधीचा फायदा उठवणाऱ्याला संधिसाधू म्हणतात. सामान्यपणे या शब्दाला स्वार्थी छटेचा वास येत असला तरी व्यापार-उद्योगात मात्र हा गुण आदरार्थी ठरतो. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अंगात संधिसाधूपणाची वृत्ती गरजेची असते.

बिझनेस करताना संधी कशी शोधावी
बिझनेस करताना संधी कशी शोधावी

 

धनंजय दातार

तरुणांना उद्योजकीय मार्गदर्शन करताना मला दोन प्रश्न अगदी हमखास विचारले जातात. पहिला म्हणजे एका लहानशा दुकानातून तुम्ही जागतिक विस्ताराचा उद्योग समूह कसा साकारलात आणि दुसरा म्हणजे व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आम्ही काय करावे? या दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर म्हणजे – हातातील संधी न सोडण्याचे कौशल्य.

लहानपणी मुंबईत कलिना येथे राहात असताना मी फावल्या वेळात गृहिणी आणि शाळकरी मुलींना चिंचा-बोरे विकायचो. पुढेही महाविद्यालयीन वयात मी मुंबईच्या उपनगरांत दारोदार फिरुन फिनेल, इन्स्टंट मिक्स अशी उत्पादने विकायचो. विक्रीकलेची हाती आलेली संधी मी सोडली नाही. त्याचा फायदा मला पुढे दुकान यशस्वी चालवण्यात झाला.

माझ्या वडिलांनी आयुष्यभर नोकऱ्या केल्या आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना ते दुबईतून भारतात परत येण्याच्या मार्गावर होते. त्याच काळात त्यांना आढळले, की दुबईत कामानिमित्त स्थलांतरित भारतीयांना त्यांच्या आवडीचे व सवयीचे मसाले, लोणचे, चटण्या, पिठे अशा वस्तू सहजपणे मिळत नसत. आपण असे दुकान काढल्यास ते चांगले चालेल, या विश्वासाने बाबांनी ती संधी साधली आणि त्यांचा व्यवसायात प्रवेश झाला. अशा रीतीने दातार घराण्यातील पहिली व्यक्ती नोकरदाराची दुकानदार बनली.

वरील दोन घटनांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे समजा मी आणि माझ्या बाबांनी समोर आलेल्या संधीचा फायदा उठवला नसता तर आज आम्हीही लाखो नोकरदारांपैकी एक बनून राहिलो असतो आणि नोकरी करणे कसे हितावह आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवत असतो.

बाबांनी मला एक छान प्रेरणादायी कथा सांगितली होती. ब्रिटीश राजवटीत बंगालमध्ये ढाका जिल्ह्यातील तेवटा गावात पंचानन दास नावाचा एक गरीब मुलगा होता. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तो काही नातलगांच्या दयेवर चरितार्थ चालवत होता. शिक्षण फारसे झाले नसले तरी तो बुद्धीने तल्लख व प्रामाणिक होता. तो उदरनिर्वाहासाठी बाहेर पडला व अत्रेयी नदीवर असलेल्या खानसामा गावात एका तंबाखूच्या व्यापाऱ्याच्या पदरी हरकाम्या म्हणून काम पाहू लागला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो व्यापारी त्याच्यावर मोठे व्यवहार सोपवू लागला.

एकदा अशी घटना घडली, की बाजारात तंबाखूचे भाव पडले होते आणि पंचाननच्या मालकाकडेही तंबाखूचा मोठा साठा पडून होता. निराश झालेल्या मालकाला पंचानन धीर देत राहिला. तो नदीवर फिरत असताना त्याला तंबाखूने भरलेली जहाजे तेथे नांगरलेली दिसली. चौकशी करता कळले, की त्यांनाही कुणी ग्राहक न मिळाल्याने ती तेथेच थांबून होती. पंचाननला एक गोष्ट पक्की ठाऊक होती, की जेथे मंदी असते तेथे तेजी येतेच. त्याने तो सर्व साठा मालकाचे नाव सांगून उधारीवर विकत घेतला आणि विसार म्हणून हातातील सोन्याची अंगठी काढून जहाज मालकांना दिली. घरी परत येताच त्याच्या मालकाने त्याला एक आनंदाची बातमी दिली. कलकत्त्याच्या बाजारपेठेत तंबाखूचे भाव पुन्हा वधारु लागले होते. हे समजताच पंचाननने वेळ गमावला नाही. त्याने मालकाचा व स्वतःचा असा सर्व तंबाखूचा साठा ५० टक्के नफा घेऊन तातडीने बाजारात विकला. त्यात त्याला स्वतःचा दहा हजार रुपये फायदा झाला. या त्याच्या कौशल्यावर तो मालक इतका खूश झाला, की त्याने पंचाननला सांगितले, की यापुढे तू माझ्याकडे नोकर म्हणून राहू नकोस. तुला संधी साधण्याची कला अवगत आहे. तू फार मोठा व्यापारी होशील. ते शब्द खरे झाले. पंचानन दासने त्या दहा हजार रुपये भांडवलावर धंदा सुरू केला व पुढच्या काळात राजासारखे वैभव कमावले. पंचाननने ही संधी वाया घालवली असती तर?

मित्रांनो, या पंचाननच्या गोष्टीप्रमाणेच मलाही अनुभव आला आहे. इराक-कुवेत युद्धाच्या वेळी दुबईवर बाँब हल्ला होण्याच्या भीतीने तेथील व्यापारी दुकाने बंद करुन जवळपासच्या देशांमध्ये आसरा घेत होते. लोकांना वस्तूंची गरज होती, पण दुकाने बंद असायची, हे मी हेरले. मी दुबई सोडली नाही. उलट रात्री बारापर्यंत दुकान उघडे ठेऊन लोकांना रास्त किंमतीत माल पुरवला. मी संधी न सोडल्याने माझा वर्षाचा माल चार महिन्यांतच विकून संपला आणि मला चौपट नफा झाला. ‘मोका देखके चौका मारनेका’, हे यशाचे सूत्र मी त्यातून शिकलो. एक छान इंग्रजी म्हण आहे.

मेक हे व्हाईल द सन शाईन्स

(लख्ख सूर्यप्रकाश असेल तोवरच घराबाहेर पडून आनंद लुटा. म्हणजेच संधीचा वेळीच फायदा उठवा.)

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

Whats_app_banner