पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बॅंकेकडून व्याजदरात कपात, वाचा कर्जावर बचत किती?

स्टेट बँक

रिझर्व्ह बॅंकेने गेल्याच आठवड्यात रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने त्याला प्रतिसाद दिला आहे. स्टेट बॅंकेने आपल्या एमसीएलआरमध्ये (ज्यावर बँकेच्या कर्जाचा व्याजदर ठरतो) कपात केली आहे. नोव्हेंबर २०१७ नंतर पहिल्यांदाच बँकेने ही कपात केली आहे. स्टेट बॅंकेचा एमसीएलआर आता ८.५० टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये ०.०५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याआधी हा दर ८.५५ टक्के इतका होता.

एमसीएलआरचा दर काय आहे, यावरच बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध कर्जांचे व्याज किती असेल, हे निश्चित केले जात असते. त्यावर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे व्याजदर ठरत असते. स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये केलेल्या कपातीनंतर आता स्टेट बॅंकेच्या २० वर्षांसाठी घेतलेल्या ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर साधारणपणे ग्राहकाची ३८५०० रुपयांची बचत होणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिल या दोन महिन्यात घेतलेल्या पतधोरण आढाव्यात दोन्हीवेळी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेंकडून व्यावसायिक बँका ज्या दराने अल्पमुदतीचे कर्ज घेतात, त्यालाच रेपो रेट म्हटले जाते. रेपो रेट कमी केल्यावर बँकांचे कर्जाचे व्याजदरही कमी होत असते. त्याचवेळी रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांच्या कर्जाचे व्याजदर वाढते.