पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक मेपासून स्टेट बँकेचे नवे नियम, ग्राहकांना फायदा

स्टेट बँक

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे स्टेट बँकेचे अल्प मुदतीच्या कर्जावरील आणि ठेवींवरील व्याज त्याचबरोबर बचत खात्यांवरील व्याज रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना मिळणार असून, येत्या एक मे पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्या रेपो दरात बदल केल्यावर त्याचा परिणाम लगेचच स्टेट बँकेच्या खातेदारांना मिळेल. म्हणजे रिझर्व्ह बँकेने त्यांचे रेपो दर कमी केले, तर स्टेट बँकेच्या अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात त्याप्रमाणे कपात होईल.

आपले व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडणारी स्टेट बँक देशातील पहिली बँक ठरली आहे. अर्थात बचत आणि अल्प मुदतीच्या खात्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक ठेव असल्यासच त्याला या सुविधेचा फायदा होईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला. बँकेने रेपो दर साडेसहा टक्क्यांवरून सव्वासहा टक्के केला होता. याआधीच्या पतधोरण आढाव्यातही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली होती. आता स्टेट बँकेने त्याचे अल्प मुदतीचे कर्ज, एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवी, एक लाख रुपयांपेक्षा अधिकची कॅश क्रेडिट खाती आणि ओव्हरड्राफ्ट रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ किंवा कपात याचा होणारा परिणाम स्टेट बँकेच्या ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचणार आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या बदलाचा फायदा बँकांकडून लवकर ग्राहकांना दिला जात नव्हता. याबद्दल अनेकवेळा रिझर्व्ह बँकेने नाराजी व्यक्त केली होती.