पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RTGS आणि NEFT वरील शुल्क रिझर्व्ह बँकेकडून माफ

संग्रहित छायाचित्र

अधिकाधिक ग्राहकांनी RTGS आणि NEFT या डिजिटल सुविधांचा वापर करावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने गुरुवारी या दोन्हीवरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीने हा निर्णय घेतला. त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा थेट ग्राहकांना मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात लेखी आदेश बँकांपर्यंत पोहोचवले जातील, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, कर्जे आणखी स्वस्त होणार

बँकेतील एका खात्यातून दुसऱ्या खात्यात किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठविण्यासाठी ग्राहकांकडून RTGS किंवा NEFT यांचा वापर केला जातो. कमी वेळेत आणि सुरक्षितपणे पैसे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांकडून वापर केला जातो. RTGS आणि NEFT वर बँकांकडून नाममात्र शुल्क आकारले जाते. ते संबंधित व्यक्तीच्या खात्यातून RTGS किंवा NEFT केल्यावर वसुल केले जाते. आता रिझर्व्ह बँकेने हे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

साधारणपणे मोठी रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी RTGS चा (Real Time Gross Settlement) वापर केला जातो. तर छोट्या रकमेचे हस्तांतर करण्यासाठी NEFT चा (National Electronic Funds Transfer) वापर केला जातो. अधिकाधिक लोकांनी डिजिटल माध्यमातून पैसे पाठवावेत, यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.  

लवकरच AC लावून कारचे मायलेज मोजणे कंपन्यांसाठी बंधनकारक

दरम्यान, एटीएमच्या वापराबद्दल ग्राहकांकडून आकारण्यात येणारे शुल्क आणि त्याच्याशी संबंधित इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती नेमली आहे. भारतीय बँक संघटनेच्या सीईओंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीला पहिल्या बैठकीनंतर दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. या समितीमध्ये या विषयाशी संबंधित सर्व घटकांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.