पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जे स्वस्त होणार, रेपो दरात पाव टक्का कपात

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक, गुंतवणूक तज्ज्ञ ज्याची शक्यता वर्तवित होते, ते अगदी खरे ठरले. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने गुरुवारी द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात पाव टक्क्याने कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. बँकेच्या या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर रेपो दर सव्वा सहा टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर आला आहे.

महागाईचा निर्देशांक चार टक्क्यांवर राहण्याच्या उद्देशाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बँकेने स्पष्ट केले. चालू वर्षात सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचे सर्वस्तरांतून स्वागत करण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञांनीही बँकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के इतका ठेवण्यात आला असून, बँक रेट ६.२५ टक्के ठेवण्यात आला आहे. पतधोरणाचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये ४ विरुद्ध २ मतांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीतील सदस्य चेतन घाटे आणि विरल आचार्य यांनी रेपो दरात कपात करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली. २०१८ मध्येच रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ करून तो साडेसहा टक्के केला होता. आता २०१९ च्या सुरुवातीला तो पुन्हा सहा टक्क्यांवर येऊन स्थिरावला आहे.

रेपो दर म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या व्याजाने कर्ज देते, त्याला रेपो दर असे म्हटले जाते. रेपो दर कमी झाल्यास बँकांकडून विविध कर्जांवरील व्याजदरात कपात केली जाते. त्याचबरोबर बँकांकडील ठेवींवरीलही व्याजदरातही कपात केली जाते. 

रेपो दर कमी होण्याचा ग्राहकांना काय फायदा?
जर तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर तुमच्या कर्जावर आकारले जाणारे व्याजदर रेपो दरात कपात करण्यात आल्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या कर्जावरील व्याजदर तरल (फ्लोटिंग) असेल, तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.