देशातील सर्वांत मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने पुढील वर्षी एप्रिलपासून डिझेल कारची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२० पासून डिझेल कारचे उत्पादन करणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
डिझेल इंजिनच्या BS-VI मानकानुसार अपग्रेड करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता १.५ लिटर कमी क्षमतेच्या लाइनअपमध्ये डिझेल इंजिन उपलब्ध नसेल. मागणी असल्यास १.५ लिटर डिझेल इंजिनला पुन्हा एकदा लाँच केले जाऊ शकते. कंपनीने या निर्णयात हलक्या व्यावसायिक वाहनांचाही समावेश केला आहे. आता ही वाहने सीएनजी पॉवरट्रेन प्रकारात मिळेल.
कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले की, एप्रिल २०२० पासून बीएस-६ प्रदूषण निकष लागू होत आहेत. यासाठी इंजिनमध्ये बदल करावे लागणार असल्याने वाहनांची किंमत २० ते २५ टक्क्यांनी वाढतील, तर पेट्रोल कारच्या किमती २५ हजार ते ६० हजारांपर्यंत वाढू शकतील. डिझेल कारच्या किमती २.५ लाखांपर्यंत वाढू शकतात.
कंपनीने नुकताच BS-VI इंजिन असलेले बलेनो आणि आल्टो कार लाँच केली होती. चांगली मागणी असल्यास डिझेल इंजिन पुन्हा एकदा लाँच केले जाऊ शकते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी कंपनीने ४.६३ लाख कार विकल्या होत्या. वार्षिक विक्रीत अशा डिझेल कारच्या विक्रीचा वाटा २३ टक्के आहे.
पेट्रोल-डिझेल कारचा वाटा
वर्ष पेट्रोल डिझेल
२०१२-१३ ५३% ४७%
२०१३-१४ ५८% ४२%
२०१४-१५ ६३% ३७%
२०१५-१६ ६६% ३४%
२०१६-१७ ७३% २७%
२०१७-१८ ७७% २३%