पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ग्राहकांना विमा पॉलिसीची सर्व माहिती वेळेत द्या'

विमा पॉलिसी

जीवन विमा, आरोग्य विमा आणि तर सर्व विमा योजनांमध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी विमा नियामक प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोणत्याही ग्राहकाने विमा कंपनीकडे दाखल केलेला दावा तात्काळ निकाली काढला गेला पाहिजे. दाव्याची सद्यस्थिती काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती ग्राहकांना दिली पाहिजे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. येत्या एक जुलैपासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कोणत्याही ग्राहकाने विमा कंपनीकडे विमा योजनेअंतर्गत दावा दाखल केल्यानंतर त्याची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती ग्राहकांना वेळोवेळी दिली पाहिजे. एखाद्या विमा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर त्याबद्दलही ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. अनेक ग्राहक आपल्या आयुष्यातील मोठी बचत विमा कंपनीकडे गुंतवत असतात. पण पॉलिसीची मुदत संपल्यावर काय करायचे हे त्यांना कळत नाही. त्यांना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये भटकावे लागते. ही वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी विमा कंपनीने स्वतःहून पावले उचलणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या पॉलिसीची स्थिती काय आहे, हे त्याला कळले पाहिजे. ती कधी संपणार आहे. त्याचा प्रिमिअम कधी संपणार आहे, हे सुद्धा ग्राहकाला कळविण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे, असे विमा नियामक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा नियामक प्राधिकरणाने उपस्थित केला आहे. ज्यामध्ये कंपन्यांनी सर्व माहिती ग्राहकांना समजेल अशा स्थानिक भाषेत पुरविली पाहिजे. त्याचबरोबर ती समजायला सोपी असली पाहिजे. ग्राहकांच्या मनात आपल्या पॉलिसीबद्दल कोणतीही संदिग्धता राहता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांना पाठविण्यात येणारे एसएमएसही स्थानिक भाषेत असायला हवेत. इंग्रजीचा वापर किमान करावा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. 

ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी सर्व डिजिटल माध्यमांचा वापर केला जावा. त्याचबरोबर कोणत्याही फसवणुकीपासून आपल्या ग्राहकांना सावध ठेवण्यासाठीही विमा कंपनीने पुढाकार घेतला पाहिजे, असे विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.