पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारतीय अर्थव्यवस्था २०३०पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकावर'

अरुण जेटली

येत्या २०३० मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असे भाकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. त्यावेळी देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दहा ट्रिलियन डॉलरपर्यंत गेले असेल, असेही त्यांनी म्हटले. देशातील नागरिकांकडून केली जाणारी गुंतवणूक आणि वाढणारी मागणी याच्या जोरावर हा विकास शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या भारतीय अर्थव्यवस्था २.९ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. सध्या आपण पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर आहोत. रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव याच्यावर आपला क्रमांक सध्यातरी ठरतो आहे, असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. ते श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, जर भविष्याचा विचार केला तर २०२४ मध्ये आपली अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली असेल. तर २०३० किंवा २०३१ पर्यंत आपण १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलो असू. त्यावेळीच एकूण जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक तिसरा असेल. अमेरिका आणि चीननंतर जगात भारतीय अर्थव्यवस्थेचाच क्रमांक असेल. पण त्यावेळी अमेरिका, चीन आणि भारत यांच्यामध्ये मोठी स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अर्थव्यवस्था विस्तारणार असल्यामुळे देशात विविध संधीही निर्माण होतील, असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. 

पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण भागात विविध सेवांचा विस्तार आणि स्त्री-पुरुष समानता यामध्ये आपल्याला येत्या २० वर्षात मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल. २०११ मधील जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी २१.९ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते. सध्याच्या विकासदराचा विचार केल्यास ही टक्केवारी १७ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, असे अरुण जेटली यांनी सांगितले. सन २०२४-२५ पर्यंत दारिद्र्य रेषेखालील लोकांची टक्केवारी एक आकडी झालेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जेटली स्वतः याच कॉलेजचे विद्यार्थी होते.