पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जाचे हफ्ते घरभाड्यापेक्षा स्वस्त करण्याचे आमचे ध्येय - अरुण जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

एखाद्या घरात भाड्याने राहताना द्यावे लागणाऱ्या भाड्यापेक्षा गृहकर्जाचा हफ्ता कमी असला पाहिजे, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्विमासिक पतधोरण आढाव्यावेळी बुधवारी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. त्या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी ही भूमिका मांडली आहे.

रेपो दरात कपात करण्यात आल्यामुळे आता व्यावसायिक बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदरही कमी केले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. त्याचा फायदा आता बँकांना सामान्य कर्जदारांना द्यावाच लागणार आहे. 
अरुण जेटली म्हणाले, रेपो दरात कपात करण्यात आल्यामुळे आता बँकांना आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात करावीच लागेल. बँका व्याजदर कमी करतील, असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर व्याजदर कमी होण्याची परंपरा पुढील काळातही सुरूच राहू शकते. येत्या काळात घरभाड्यापेक्षा गृहकर्जाचा हफ्ता कमी करण्याकडे आमचे लक्ष असेल. मला विश्वास आहे की येत्या काळात हे नक्कीच होईल.

रेपो दरात रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा कपात केली आहे. रेपो दराच्या साह्यानेच रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देत असते. यामध्ये घट झाल्यामुळे आता बँकांनाही कर्जावरील व्याजदर कमी करावे लागेल. कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे कर्ज घेणाऱ्याचे प्रमाण वाढेल. घरांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. 

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील एक आठवण सांगताना अरुण जेटली म्हणाले, वाजपेयी पंतप्रधान असतानाची एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी गृहकर्जावरील व्याजदर हे घरभाड्यापेक्षा कमी झाले होते. त्याच दिशेने पुन्हा एकदा गेले पाहिजे. गृहकर्जाचे व्याजदर तितके कमी केले गेले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू.