पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICICI बॅंकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर ED पुढे चौकशीसाठी हजर

चंदा कोचर

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर बेकायदा कर्ज आणि अन्य गैरव्यवहारांच्या प्रकरणामध्ये सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. खान मार्केट भागातील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दिलेल्या वेळेआधीच त्या पोहोचल्या.

पैशांची अफरातफरविरोधी कायद्यान्वये (पीएमएलए) चंदा कोचर यांना तपास संस्थांना पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चंदा कोचर यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनाही या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. त्याचबरोबर त्यांचे दीर राजीव कोचर यांचीही काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणावरून १ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने कोचर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांमध्ये त्याचबरोबर व्हिडिओकॉन समुहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांच्या निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर राजीव कोचर यांची मुंबईमध्ये चौकशी करण्यात आली होती.

सक्तवसुली संचालनालयाने पीएमएलए कायद्यातील तरतुदींनुसार यापूर्वीच चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १८७५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.