खासगी क्षेत्रातील येस बँकेवरील रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. ग्राहक आता पूर्वीप्रमाणे सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात, असे ट्विट येस बँकेने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन केले आहे. येस बँकेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले होते. बँकेवरील निर्बंधामुळे ग्राहकांना पैसे काढण्यावर ५० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती.
राहुल गांधींनी मागितली ५० कर्जबुडव्यांची नावे
खातेदारांचे हित लक्षात घेऊन या बँकेच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारने याला मंजूरी दिल्यामुळे या बँकेतील खातेधारकांची चिंता मिटली आहे. बँकेच्या पुनर्रचनेच्या आराखड्यानुसार, एसबीआय पुढील तीन वर्ष बँकेतील आपल्या हिस्सेदारीचा वाटा २६ टक्क्याहून कमी करु शकत नाही. एवढेच नाही तर बँकेतील गुंतवणूकदार आणि सध्याच्या घडीचे शेअरधारकांच्या ७५ टक्के गुंतवणुकीसाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असणार आहे. १०० पेक्षा कमी शेअर धारकांना या नियमातून वगळण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या अपयशाचा फटका देशाला सहन करावा लागेल: राहुल गांधी
येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून उचलण्यात येणाऱ्या पावलाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. शेअर बाजारात येस बँकेच्या शेअर्सनी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्चपर्यंत येस बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. खातेधारकांना कष्टाचे पैसे बुडण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या पुढाकारानंतर येस बँक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे.