कोराना विषाणूच्या प्रभावामुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तेलाच्या किेंमतीत झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला. कोरोनाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा जवळपास ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
कोरोनामुळे तिसऱ्या आठवड्यातही पडझड, सेन्सेक्स २३४२ अंकांनी आपटला
शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार १,४४,३१,२२४.४१ कोटी रुपये इतका होता. सोमवारी सुरुवातीलाच व्यवहारात १, ३९,३९,६४०.९६ एवढी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात आर्थिक मंदीची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. ओएनजीसी, रिलायन्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एलअँण्डटी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या प्रमुख कंपन्यांचे शेअरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ३,५९४.८४ कोटी रुपयेची इक्विटीची (समभागसंलग्न गुंतवणूक) विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,५४३.७८ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे देशांतर्गत गुंतवणुकदार सावध पवित्रा घेत आहेत. कोरोनाशिवाय येस बँकेच्या संकटामुळे बँकिंग क्षेत्रातील स्थितरतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यापार क्षेत्रात उमटताना दिसत आहे.
कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांने कोसळले, १९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण
मागील आठवड्याच्या अखेरीस (शुक्रवारी) शेअर बाजारात उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई बाजारातील सेन्सेक्स ८८३.९९ अंक तर निफ्टी २८९.४५ अंकानी घसरणीसह क्रमश: ३७,५७६.६२ आणि १०,९७९.५५ अंक अशा स्थितीत बंद झाला होता.