पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तात्काळ गृहकर्जे खरंच तात्काळ मिळतात का?

होमलोन गृहकर्ज

होम लोन अर्थात गृहकर्ज हे जवळपास प्रत्येकाला घ्यावेच लागते. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण अलीकडे अनेक खासगी बँकांनी इन्स्टंट म्हणजेच तात्काळ गृहकर्ज देण्याची घोषणा काही वर्षांपूर्वीच केली. ही कर्जे खरंच तात्काळ असतात का, हे महत्त्वाचे असते. सध्या बँकांची सगळी प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे लवकर कर्जे मंजूर करणे बँकांना शक्य झाले आहे. पूर्वीसारखी खूपसारी कागदपत्रे, पुरावे, साक्षीदार आता सरसकट सगळ्यांनाच द्यावे लागत नाहीत. नवे गृहकर्ज असू दे की घेतलेल्या गृहकर्जावरील रक्कम वाढवणे (टॉप अप) असू दे ही प्रक्रिया खासगी बँकांनी गतिमान केली आहे. मिंटने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

तात्काळ गृहकर्ज मिळण्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे आता कोणत्याही कर्जदाराची पात्रता तपासण्यासाठी डिजिटल पद्धतींचा वापर केला जातो. पूर्वी कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची पत तपासण्यासाठी अनेक घटक प्रत्यक्षपणे तपासले जात होते. ती प्रक्रिया वेळखाऊ होती. पण आता एखाद्याची पत काय आहे हे त्याच्या ऑनलाईन प्रोफाईलवरून सहज कळते. 

एक मेपासून स्टेट बँकेचे नवे नियम, ग्राहकांना फायदा

डिजिटलकरणाची प्रक्रिया दहा वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याची फळे गेल्या ४-५ वर्षांपासून चाखण्यास मिळत आहेत. आधारच्या साह्याने ईकेवायसी प्रक्रिया करून ६० हजार रुपयांची कर्जे तात्काळ देण्याची प्रक्रिया अस्तित्त्वात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अर्जांवर डिजिटल प्रक्रिया करण्याच्या पद्धतीला बळच मिळाले, असे एक्स्पेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष सिंघल यांनी सांगितले. 

एखाद्याने शॉपिंगसाठी किती पैसे कशा पद्धतीने खर्च केले आहेत. त्यासाठी कोणत्या वॅलेट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करण्यात आला, ते पैसे कशा पद्धतीने चुकते करण्यात आले, याचाही आता कर्ज देण्यासाठी पूरक घटक म्हणून बँकांकडून वापर केला जातो, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

तात्काळ कर्जे ही कोणत्याही पेपरविना मंजूर केली जात असल्याचे बँकांकडून सांगितले जात असले, तरी वास्तवात ते तसे नसते. कर्ज मंजूर होण्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन नसते. त्यामुळे कर्ज मागणाऱ्या व्यक्तीला बँकेत जावे लागतेच. त्याचबरोबर काही कागदपत्रे द्यावी लागतातच. कर्ज मंजूर झाल्याचे पत्र बँकेकडून मिळाल्यानंतर ते पैसे संबंधित बांधकाम व्यावसायिक किंवा समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये खरेदी करार, विक्री करार, इंडेक्स दोन या सारख्या कागदपत्रांचा समावेश असतो, असे मायमनी मंत्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक राज खोसला यांनी सांगितले.

कोटक महिंद्रा बॅंकेच्या नफ्यात वाढ, चौथ्या तिमाहीचे आकडे आश्वासक

एखाद्या खासगी बॅँकेचे तात्काळ कर्ज घ्यायचे असेल, तर संबंधित बँकेने मंजूर केलेल्या बांधकामच्या प्रकल्पांमधून एक निवडावा लागतो. त्यानंतर तुम्हाला किती रुपयांचे कर्ज किती कालावधीसाठी हवे आहे, हे निवडावे लागते. या नंतर संबंधित कर्जदाराची पत बघून त्याला त्याच्या बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या ई-मेलवर कर्ज मंजूर झाल्याचे पत्र पाठवले जाते. पण यापुढची प्रक्रिया ही ऑनलाईन होत नाही. ती प्रत्यक्षपणे बँकेत जाऊनच करावी लागते. 

बँकांकडून गृहकर्ज मंजूर झाल्याचे पत्र मिळणे ही तत्त्वतः मान्यता असते. त्यानंतर ते कर्ज हातात मिळेपर्यंत ग्राहकांना अनेक कागदपत्रे बँकांकडे द्यावीच लागतात. त्या कागदपत्रांची बँकेकडून पडताळणी होते. तुमच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाते. हे सर्व सकारात्मक असले, तरच संबंधित बँकेकडून कर्ज प्रत्यक्षात दिले जाते.

अधिकाधिक लोकांनी आपल्या बँकेचे कर्ज घ्यावे, म्हणून तात्काळ कर्ज देण्याची प्रक्रिया बँकांकडून सुरू करण्यात आली आहे. पण सर्व प्रक्रिया तात्काळ होत नाही. कर्ज प्रत्यक्ष हातात येईपर्यंत आवश्यक वेळ द्यावाच लागतो आणि इतर नियम अटींचे पालन करावेच लागते.