starlineps enterprises share price : जेमतेम साडेपाचशे कोटींचं भांडवली मूल्य असलेल्या स्टारलाइनप्स एन्टरप्रायझेस या स्मॉल कॅप कंपनीचा शेअर सलग चौथ्या दिवशी तेजीत आहे. आजही हीच तेजी कायम राहिली आणि शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. मागच्या अवघ्या चार दिवसांत हा शेअर ४० टक्के उसळला आहे. त्यामुळं गुंतवणूकदार खूष झाले आहेत.
स्टारलाइनप्स एन्टरप्रायझेसचा शेअरला आज, २१ ऑगस्ट रोजी बीएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर १४५.७५ रुपयांवर पोहोचला. गेल्या शुक्रवारपासून या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. १४५.७५ रुपयांच्या आजच्या उच्चांकी पातळीसह या शेअरनं चार दिवसांत जवळपास ४० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
गेल्या मंगळवारी (१३ ऑगस्ट) हा शेअर १८५.८० रुपयांवर होता. ही ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी होती. मात्र, दोन सत्रांच्या घसरणीनंतर तो पुन्हा तेजीच्या मार्गावर धावू लागला आहे. या वर्षी १४ मार्च रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी ८३.३० रुपयांच्या पातळीवरून हा शेअर ७५ टक्क्यांनी वधारला आहे.
शेअरच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीला कंपनीनं एआय तंत्रज्ञानातील धोरणात्मक गुंतवणुकीबद्दल केलेल्या घोषणा आणि ऑर्डरची पूर्तता कारणीभूत ठरली आहे. कंपनीनं १६ ऑगस्ट रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, कंपनीच्या व्यवस्थापनानं राइटप्लस एआय प्रायव्हेट लिमिटेडमध्ये २६.९ लाख रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळं लियाप्लसमधील कंपनीचा नॉन-कंट्रोलिंग इक्विटी हिस्सा सुरक्षित होतो. लियाप्लस एआय अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान पुरवते. त्यामुळं कंपनीची ऑपरेशनल कार्यक्षमता आणि ग्राहक सेवा क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
स्टारलाइनप्स एन्टरप्रायझेसला नुकतीच एक ऑर्डर मिळाली आहे. नैसर्गिक हिऱ्यांच्या पुरवठ्यासाठी साकेत इम्पेक्सकडून ३७.९६ कोटी रुपयांचं इरादापत्र मिळालं आहे, असं कंपनीनं २० ऑगस्ट रोजी एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे. ३० सप्टेंबर २०२५ च्या आधी ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. ही ऑर्डर मागील आर्थिक वर्षातील एकूण महसुलापेक्षा जास्त आहे, मागील वर्षीचा एकूण महसूल ३०.३१ कोटी रुपये होता.