Share Market News : आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणुकीला चालना देण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळं या क्षेत्रातील टेक कंपन्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे आघाडीचे निर्देशांक बुधवारी, २२ जानेवारी रोजी तेजीसह उघडण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळं जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, या शक्यतेनं अमेरिकी बाजारानं मागील व्यवहार सत्राचा शेवट हिरव्या रंगात केला. दुसरीकडं, बाजारात खळबळ माजवणाऱ्या अमेरिकन रोख्यांचा धुरळा आता खाली बसू लागला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन : कंपनीला सिग्नलिंगसाठी वायव्य रेल्वेकडून ४६.७९ कोटी रुपयांची वर्कऑर्डर मिळाली आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स : या कंपनीचा निव्वळ नफा डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ४३ टक्क्यांनी वाढून ३२६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २२७ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत ४३ टक्क्यांनी वाढून ४८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पंजाब नॅशनल बँकेनं प्रवर्तित केलेल्या या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीनं गेल्या वर्षी याच तिमाहीत ३३८ कोटी रुपयांची कमाई केली होती.
एचडीएफसी बँक : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आज डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजच्या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर १ टक्का घट झाली आहे. चालू तिमाहीत कंपनीला १६८.६४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला १७०.२२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
तानला प्लॅटफॉर्म्स : आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १५ टक्क्यांनी घसरून ११८.५१ कोटी रुपयांवर आला आहे.
टाटा एलेक्सी : कंपनीने ब्लॉकचेनवर चालणारी ट्रेसेबिलिटी सोल्यूशन्स प्रोव्हायडर असलेल्या माइनस्पायडरसोबत हातमिळवणी केली असून मोबियस+ हा प्रगत बॅटरी लाइफसायकल मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.
जना स्मॉल फायनान्स बँक : आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा १७.९१ टक्क्यांनी घसरून ११०.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निव्वळ नफ्यात सप्टेंबर २०२४ तिमाहीतील ९६ कोटी रुपयांच्या तुलनेत १४.६० टक्क्यांची सुधारणा दिसून आली. बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ५९३ कोटी रुपये झालं असून, ते आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ५४९ कोटी रुपयांच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढलं आहे.
इंडिया सिमेंट्स : विक्रीमुळं कंपनीला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ११६.५२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे.
सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर : कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात डिसेंबर तिमाहीत अनेक पटींनी वाढ होऊन तो सुमारे ८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला १.११ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
संबंधित बातम्या