share market : भारतीय शेअर बाजारचे दोन प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० यात १० जुलै रोजी सुमारे एक टक्के घसरण झाली. ही घसरण गरजेची होती असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प आणि पहिल्या तिमाहीच्या निकालांवर गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. अमेरिका आणि भारतातील महागाईचा दर आणि व्याजदरातील बदलावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत योग्य किंमतीत मिळत असलेल्या दर्जेदार शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वेल्थ मॅनेजमेंट फर्म देवेन चोक्सीनं जुलै महिन्यासाठी सहा शेअर्सची यादी दिली आहे. कोणते आहेत हे सहा शेअर? जाणून घेऊया…
टीसीएसच्या शेअरचा सध्याचा भाव ३९०५ रुपयांच्या आसपास आहे. त्यात पाच टक्के वाढीची अपेक्षा असून तो ४१९४ पर्यंत जाऊ शकतो.
टीसीएस सध्या एआय, नवीन ऊर्जा, पुरवठा साखळी आणि टॅलेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडच्या काळात त्या पातळीवर कंपनीनं अनेक करार केले आहेत. टीसीएसला देशातील चार भागात मोठे डेटा सेंटर सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून १५ ० दशलक्ष डॉलर्सची ऑर्डर मिळाली आहे. टीसीएस आणि एडब्ल्यूएसनं क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी आणि ग्राहकांना जेनएआय सोल्यूशन्समध्ये प्रवेश देण्यासाठी धोरणात्मक बहु-वर्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. खुल्या मानकांचा वापर करून ५ जी आणि ६ जी कम्युनिकेशन स्टॅक्स इंजिनीअरिंग करण्यात टीसीएस आघाडीवर आहे. बेंगळुरू आणि गुरुग्राम मध्ये भविष्यासाठी तयार दळणवळण पायाभूत सुविधा आणि इंटरऑपरेबिलिटीसाठी समर्पित दोन अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. ऊर्जा संक्रमण प्रकल्पांना पुढं नेण्यासाठी कंपनीनं ऊर्जा व्यवस्थापनात धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित केली आहे, असं देवेन चोक्सी यांनी सांगितलं.
बजाज फायनान्सचा शेअर सध्या ६९६० च्या आसपास ट्रेड करत आहे. हा शेअर १३ टक्क्यांनी वाढू शकतो. नजिकच्या काळात हा शेअर ८ हजारपर्यंत जाऊ शकतो.
उत्पादन वैविध्य आणि सर्वव्यापी रणनीती कंपनीच्या मजबूत व्यवसायाला चालना देत आहे. गेल्या १७ वर्षांत बजाज फायनान्सनं एयूएममध्ये ३६ टक्के सीएजीआर आणि पीएटीमध्ये ५० टक्के सीएजीआर वाढ केली आहे. ही वाढ कंपनीच्या यशस्वी भौगोलिक विस्तारामुळं झाली आहे. त्यामुळं कंपनी भारतातील नवीन बाजारपेठा आणि ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे, असं देवेन चोक्सी म्हणाले.
बालाजी अमाइन्सचा शेअर सध्या एनएसईवर २३३८ रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर २६४३ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. क्षमता विस्तार आणि किंमत वसुलीमुळे कंपनीच्या वाढीला चालना मिळेल, असा विश्वास देवेन चोक्सी यांनी व्यक्त केला. अलीकडच्या एन-ब्युटिल अमाइन्सच्या यशस्वी उत्पादनामुळं कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता १५ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. त्यामुळं देवेन चोक्सी या शेअरबद्दल आशावादी आहेत.
डीसीएक्स सिस्टिमचा शेअर सध्या ४२३ रुपयांच्या आसपास आहे. हा शेअर ५१९ पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड ही एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली आणि केबल हार्नेसची अग्रगण्य भारतीय उत्पादक आहे. डीसीएक्सनं रेल्वेसाठी अडथळा शोध उपकरणे यशस्वीरित्या विकसित केली आहेत. भारताच्या १४,००० लोकोमोटिव्हचा मोठा ताफा आणि सरकारनं तांत्रिक अद्ययावतीकरणासाठी ३,४०,००० दशलक्ष रुपयांची तरतूद केल्यामुळं डीसीएक्सनं एनआयएआरटीच्या माध्यमातून ही संधी साधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं देवेन चोक्सी यांनी सांगितलं.
एसबीआय लाइफच्या शेअरचा भाव सध्या १५५० रुपये आहे. हा शेअर १७०५ पर्यंत जाण्याची शक्यता देवेन चोक्सी यांनी व्यक्त केली आहे. कंपनीकडं उत्तर प्रॉडक्ट मिक्स आहे. त्याचा फायदा कंपनीला होणार आहे. येत्या तिमाहीत त्याचे व्हीएनबी मार्जिन रेंजबाऊंड राहू शकते.
श्री सिमेंटच्या शेअरचा सध्याचा भाव २७६९२ रुपयांवर आहे. हा शेअर ३०,६६२ वर जाण्याची शक्यता आहे. श्री सिमेंट ही सिमेंट आणि सिमेंटशी संबंधित उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीनं नुकताच रेडी-मिक्स काँक्रीट व्यवसायातही प्रवेश केला असून प्रीमियम प्रॉडक्ट पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी कंपनीनं दोन वर्षांसाठी १०० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे. कंपनी हरित ऊर्जेचा अवलंब करण्यावर भर देत असून पारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोतांवर कमी अवलंबून आहे. १८८ मेगावॅट हरित वीजनिर्मिती क्षमता वाढविण्याचा श्री सिमेंटचा मानस असून, त्यापैकी १४८ मेगावॅट वीज आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत उभारणं अपेक्षित आहे.