Union Budget 2025 : नव्या प्राप्तिकर प्रणालीत प्राप्तिकराची मर्यादा १२ लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर वाहन उद्योग, किरकोळ विक्री क्षेत्र (FMCG) आणि कन्झ्युमर ड्युरेबल क्षेत्रातील शेअर्स उसळी घेतील, असा अंदाज शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत हिरो मोटोकॉर्प, डाबर इंडिया, मॅरिको, व्होल्टास आणि ब्लू स्टार हे पाच शेअर्स विकत घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर यांनी ‘लाइव्ह मिंट’शी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली. 'नव्या प्राप्तिकर प्रणालीत प्राप्तिकराची मर्यादा ७ लाखरुपयांवरून १२ लाख रुपये करून सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. प्रत्यक्ष करातील या कपातामुळं मध्यमवर्गाच्या हातात अधिक पैसा असेल, त्यामुळं आर्थिक वर्ष २०२६ मध्ये त्यांचा उपभोग आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे, असं गोरक्षकर म्हणाले.
अविनाश गोरक्षकर यांच्या मताशी लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी सहमती दर्शवली आहे. 'भारताच्या विकासदराला चालना देण्यासाठी केंद्र सरकार मध्यमवर्गावर अवलंबून आहे. त्यामुळं भारतीय मध्यमवर्गाच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहिल्यास पंखे, एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, घरे, वाहने यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी करून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं शक्य होईल, अशी अपेक्षा असल्याचं जैन म्हणाले.
चारचाकी उत्पादक कंपन्यांपेक्षा दुचाकी कंपन्यांना अधिक फायदा होईल, असं प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे अविनाश गोरक्षकर यांचं मत आहे. त्याचप्रमाणे व्हाईट गुड्स बनवणाऱ्या कंपन्या कन्झ्युमर ड्युरेबल स्टॉक सेगमेंटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आयकर मर्यादेबाबत केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मधील प्रस्तावानंतर हीरो मोटोकॉर्प, डाबर इंडिया, मॅरिको, व्होल्टास आणि ब्लू स्टार या पाच शेअर्सवर लक्ष ठेवावं, असं गोरक्षकर यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या