Hindustan Copper share price : हिंदुस्तान कॉपरच्या शेअरवर आनंद राठी ब्रोकरेज फर्मनं 'बाय' कॉल दिल्यानंतर मंगळवारी शेअरच्या किंमतीत एक टक्का वाढ झाली. हिंदुस्तान कॉपरच्या शेअरमध्ये येत्या काळात अधिक चांगली तेजी दिसेल, अशी ब्रोकरेज फर्मची अपेक्षा आहे.
हिंदुस्तान कॉपरचा शेअर सध्या ३४६ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. येत्या तीन महिन्यांत हा शेअर ३९० ते ४१० रुपयांवर जाऊ शकतो. ३३६ ते ३३० च्या दरम्यान खरेदी करून २९९ रुपयांच्या स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला आनंद राठी फर्मनं गुंतवणूकदारांना दिला आहे. या शेअरमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे २० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
हिंदुस्तान कॉपरचा शेअर २२ मे २०२४ रोजी ४१५.६० रुपयांसह ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होता. तर, १३ जुलै २०२३ रोजी ११५.९० रुपयांसह ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता. हिंदुस्थान कॉपरचं बाजार भांडवल सुमारे ३३,४३५ कोटी रुपये आहे.
हिंदुस्तान कॉपर ही भारतातील एकमेव तांबे उत्पादक कंपनी आहे. तांब्याच्या उत्खननापासून ते तांब्याचे विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रक्रियेत ही कंपनी गुंतलेली आहे.
मार्च २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत हिंदुस्तान कॉपरनं १२४.७५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या १३२.१७ कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा ५.६१ टक्क्यांनी कमी आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचं परिचालनातून मिळणारं उत्पन्न किरकोळ वाढून ५६५.३७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
पुरवठा आणि मागणीचा अंदाज बघता तांब्याच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात तांब्याचा दरडोई वापर चीन आणि अमेरिकेसारख्या इतर प्रमुख देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. अमेरिका आणि चीनमधील उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाल्यानं तांब्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे, असं आनंद राठी यांनी सांगितलं.
हिंदुस्तान कॉपरच्या शेअरच्या किमतीनं एका वर्षात १९० टक्के परतावा दिला आहे, तर हा शेअर वर्ष-दर-वर्ष (YTD) २६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. हिंदुस्तान कॉपरच्या शेअरमध्ये एका आठवड्यात ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या