Makar Sankranti in Share Market : मकर संक्रांतीचा आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गोड-गोड झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीनं मोठी झेप घेतली असून बहुतेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. आयटी कंपन्या सर्वाधिक लाभार्थी ठरल्या आहेत. त्यातही गेल्या दोन वर्षांपासून स्थिर असलेल्या विप्रोनं थेट ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
आज सकाळच्या सत्रात विप्रोचा शेअर एनएसईवर १३ पेक्षा अधिक टक्क्यांनी वाढून ५२९ रुपयांवर पोहोचला. हा कंपनीच्या शेअरचा एक वर्षाचा नवा उच्चांक आहे. विप्रोच्या शेअरमध्ये ही वाढ डिसेंबर २०२३ च्या तिमाही निकालानंतर झाली आहे. कंपनीच्या निकालांनी सर्व अंदाज फोल ठरवले आहेत. कंपनीची अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्ट (ADR) १८ टक्क्यांनी वाढून ६.३५ डॉलर झाली आहे. मागच्या २० महिन्यांतील हा उच्चांक आहे.
गेल्या १० महिन्यांत विप्रोच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. २८ मार्च २०२३ रोजी विप्रोचे शेअर्स बीएसईवर ३५६.३० रुपयांवर ट्रेड करत होते. आज हाच शेअर ५२६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, विप्रोचे शेअर्स गेल्या ६ महिन्यांत ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ४१५.२५ रुपयांवरून ५२६.४५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. विप्रोच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३५१.८५ रुपये आहे.
आयटी कंपनी विप्रोनं चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीत २६९४.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे १२ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने ३०५२.९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तथापि, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीच्या तुलनेत विप्रोच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत विप्रोला २६४६.३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल २३२९० कोटी रुपये होता. यावेळी तो २२२०५.१ कोटींपर्यंत घसरला आहे.
जानेवारी २०२२ नंतर कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण सुरू होती. २०२३ च्या वर्षात ही घसरण थांबली. मात्र, शेअर स्थिर होता. त्यात वाढ दिसत नव्हती. मागच्या एका महिन्यापासून शेअरनं पुन्हा सकारात्मक वाटचाल सुरू केली होती. आज त्यावर कळसच चढला. हा तेजी अशीच राहणार की पुन्हा शेअर स्थिर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील लेखात केवळ कंपनीच्या शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या